कुस्ती आखाड्यात लोकसभेची दंगल; जाधवांची पवारांशी जवळीक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2018 10:45 PM2018-11-14T22:45:02+5:302018-11-14T22:45:43+5:30
खंडाळा : सातारा लोकसभा मतदारसंघात आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रणांगणात हालचाली सुरू झाल्या आहेत. प्रमुख पक्षांनी आपले मोहरे मैदानात उतरविण्यासाठी ...
खंडाळा : सातारा लोकसभा मतदारसंघात आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रणांगणात हालचाली सुरू झाल्या आहेत. प्रमुख पक्षांनी आपले मोहरे मैदानात उतरविण्यासाठी कोणत्या न कोणत्या माध्यमातून संपर्क सुरू केल्याचे दिसते. सातारा लोकसभेच्या आखाड्यात तिसऱ्यांदा शड्डू ठोकण्यासाठी पुरुषोत्तम जाधव यांनी विविध उपक्रमांतून तयारी चालवली आहे. कुस्ती आखाड्यातून जिल्ह्याची अस्मिता जागृत करत राष्ट्रवादीच्या आखाड्यातही त्यांनी शड्डू ठोकल्याचे दिसते.
पुरुषोत्तम जाधव यांनी २०१९ च्या लोकसभेची तयारी सुरू असल्याचे यापूर्वीच स्पष्ट केले आहे. कुस्ती स्पर्धेच्या निमित्ताने पुरुषोत्तम जाधव हे शरद पवार यांच्यापर्यंत पोहोचले. पवारांनी संघाचे सामने स्वत: उपस्थित राहून पाहिले. तसेच या संघातील मल्लांचे कौतुकही केले. यानिमित्ताने सातारा लोकसभेसाठी इच्छुक असलेले पुरुषोत्तम जाधव यांची शरद पवार यांच्याशी जवळीक वाढली आहे. लोकसभेसाठी साताºयाच्या जागेवरून राष्ट्रवादीतच खडाजंगी सुरू असताना या नव्या घडामोडींमुळे जिल्ह्याचे लक्ष वेधले गेले आहे.
पुरुषोत्तम जाधव यांनी २००९ मध्ये शिवसेनेत प्रवेश करून सेनेचा भगवा हातात घेऊन त्यावेळी राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात थेट उदयनराजे यांच्याविरुद्ध निवडणूक लढवली. निवडणुकीत सेनेचा धनुष्यबाण खांद्यावर पेलून तब्बल २ लाख ३५ हजार ६८ एवढी मते मिळवली होती.
त्यानंतर सेनेचे जिल्हाप्रमुख म्हणून जबाबदारी पार पाडले होते. मात्र २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी साताºयाची जागा युतीच्या घटकपक्षाला दिल्याने त्यांना या निवडणुकीत ऐनवेळी अपक्ष उमेदवारी करावी लागली. तरीही त्यावेळी १ लाख ५५ हजार ९३८ एवढी लक्षवेधी मते घेतली होती. विशेषत: कºहाड दक्षिण मतदारसंघात जाधवांच्या किटलीने वातावरण गरम केले होते.
सध्या सातारा लोकसभेसाठी विविध राजकीय व्यासपीठावरून चर्चा होऊ लागल्या आहेत. सातारा जिल्ह्याच्या राजकारणात राष्ट्रवादीतील दोन राजे घराण्यात शाब्दिक चकमकी घडत आहेत. सेनेचा आवाज कधीतरी धडकत आहे. भाजपानेही जिल्ह्यात आपला विस्तार वाढवला आहे. अजूनही इनकमिंगच्या वाटा अनेकांकडून चोखाळल्या जात आहेत. त्यातच पुरुषोत्तम जाधव यांनी भाजपाच्या माध्यमातून सुरू केलेल्या ‘संपर्क फॉर समर्थन’ हा उपक्रम हाती घेऊन जिल्ह्यात बैठकाही घेतल्या होत्या. त्याचबरोबर जनकल्याण प्रतिष्ठानच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम राबविले जाऊन कुस्तिगीर परिषदेच्या वतीने तरुणांची ताकद एकवटण्याचाही प्रयत्न सुरू आहे.
मध्यंतरी आमदार शिवेंद्रसिंहराजेंच्या कार्यक्रमांना लावलेली हजेरी आणि इतर नेत्यांसह राष्ट्रवादीशी वाढती जवळीक अनेकांच्या नजरा विस्फारणारी ठरत आहे. त्यामुळे यावेळी लोकसभेचे मैदान मारण्यासाठी जाधवांची जय्यत तयारी सुरू असल्याचे दिसून येत आहे.
पाटलांच्या सूचना अन् पवारांशी जवळीक
लोकसभेच्या निवडणुकीला अजून अर्ध वर्ष बाकी आहे; मात्र अगोदरच पुरुषोत्तम जाधवांनी तयारी केल्याने अनेकांचे डोळे विस्फारले आहेत. या संपर्क फॉर समर्थन मोहिमेपूर्वी जाधवांना दस्तुरखुद्ध मंत्री चंद्रकांत पाटील यांनीच तयारीला लागण्याच्या सूचना केल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. तर अलीकडच्या काळातील पवारांशी वाढती जवळीक यामुळे येणाºया काळात आणखी कोणत्या घडामोडी घडणार? याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.