लोणंदला अनेक इच्छुकांचे पत्ते गुल
By admin | Published: January 16, 2016 11:59 PM2016-01-16T23:59:35+5:302016-01-17T00:33:01+5:30
नगरपंचयतीसाठी आरक्षण सोडत जाहीर
लोणंद : राज्य निवडणूक आयोगाने नवनिर्मित लोणंद नगरपंचायतीचा कार्यक्रम जाहीर केल्याने लोणंदच्या १७ प्रभागांची आरक्षण सोडत शनिवारी सकाळी नगरपंचायत सभागृहात वाईच्या प्रांताधिकारी अस्मिता मोरे व खंडाळ्याचे तहसीलदार शिवाजीराव तळपे यांच्या उपस्थितीत पार पडला. त्यामध्ये १७ प्रभागांमध्ये ९ महिला ८ पुरुष आहेत. त्यामुळे लोणंदमधील इच्छुक उमेदवारांच्या आरक्षणामुळे पत्ते गुल झाले आहेत.
लोणंद ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये काही महिन्यांपूर्वी रूपांतर झाले असून, नगरपंचायतीच्या प्रभाग व आरक्षण सोडतीमुळे खऱ्या अर्थाने निवडणुकीला सुरुवात झाली असून, लोणंदमध्ये नगरपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाल्याचे दिसत आहे. शनिवारी लोणंद नगरपंचायत सभागृहामध्ये प्रचंड गर्दीमध्ये व अति उत्साहात प्रक्रिया शांततेत पार पडली. प्रभाग रचना व प्रभाग आरक्षणे प्रांताधिकारी अस्मिता मोरे यांच्या अध्यक्षतेखाली तहसीलदार शिवाजीराव तळपे यांनी जाहीर केले. त्यामध्ये अनुसूचित जाती जमाती सर्वसाधारण १ या सोडत लहान मुलांच्या हातून चिठ्ठीद्वारे काढण्यात आल्या. प्रभागरचना व आरक्षणामुळे मातब्बर इच्छुकांचे पत्ते गुल झाले.
९ जागा महिलांसाठी राखीव झाल्याने नगरपंचायत निवडणुकीमध्ये पहिला नगरसेवक होऊ इच्छित असलेल्या उमेदवारांना आपल्या प्रभागामध्ये महिलांसाठी जागा सोडावी लागणार आहे. तसेच सर्वसाधारण आरक्षण असलेल्या ४ प्रभागांमध्ये इच्छुकांची फार गर्दी होणार असून, प्रभागरचना व आरक्षण सोडतीमुळे कुठे आनंदाचे वातावरण तर कुठे नाराजीचा सूर आहे. लोणंद नगर पंचायतीसाठी १७ प्रभाग हे १८ हजार ४८० लोकसंख्येनुसार करण्यात आले आहेत. दि. १८ जानेवारी ते २७ जानेवारी दरम्यान लेखी स्वरूपात हरकती प्रांताधिकारी यांच्याकडे देण्यात याव्या.
यावेळी माजी समाजकल्याण सभापती आनंदराव शेळके-पाटील, जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष अॅड. बाळासाहेब बागवान, सातारा लोकसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष राहुल घाडगे, शिवाजीराव शेळके, हर्षवर्धन शेळके-पाटील, चंद्रकांत शेळके, इम्रान बागवान, शंकरराव क्षीरसागर, लक्ष्मण शेळके आदी मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)