लोणंदचा कांदा निघाला कोलंबोला, आवक वाढली; निर्यात सुरू झाल्याने दरात वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2020 04:44 AM2020-03-11T04:44:48+5:302020-03-11T06:38:41+5:30
लोणंद येथील कांदा व्यापारी दुबई, कोलंबो व आखाती देशात निर्यात करतात. मात्र, काही महिन्यांपासून कांद्यावर निर्यात बंदी असल्याने निर्यात बंद होती
लोणंद (जि.सातारा) : संपूर्ण महाराष्ट्रात नावाजलेली लोणंदची कृषी उत्पन्न बाजारपेठ सध्या निर्यात बंदी उठल्याने बहरू लागली आहे. होळी सणाच्या मुहूर्तावर गरव्या कांद्याच्या निर्यातीस सुरुवात करण्यात आली असून, साडेपाचशे टन कांदा कोलंबो येथे निर्यात करण्यासाठी पॅकिंगसह तयार झाला आहे.
सोमवार झालेल्या आठवडा बाजारात ९०० पिशव्या गरव्या कांद्याची आवक झाली आहे. १९६० रुपये पर्यंत कांद्याचे दर निघाले. बाजार समितीमध्ये मंगळवारपासून कांद्याच्या निर्यातीला सुरुवात करण्यात आली आहे. मागील आठवड्याच्यापेक्षा यावेळी दरामध्ये वाढ दिसून आली. लोणंद येथील कांद्याची प्रत चांगल्या दर्जाची आहे. तसेच चवीलाही हा कांदा चविष्ट असल्याने या कांद्याला परदेशातून नेहमीच वाढती मागणी असते.
लोणंद येथील कांदा व्यापारी दुबई, कोलंबो व आखाती देशात निर्यात करतात. मात्र, काही महिन्यांपासून कांद्यावर निर्यात बंदी असल्याने निर्यात बंद होती. कांद्याची आवक वाढल्याने कांद्याच्या दरात घसरण सुरू होती. पुरवठा जास्त व मागणी कमी असल्याने शासनाने पुन्हा कांदा निर्यात करण्यास परवानगी दिल्याने कांद्याच्या दरात वाढ झाली असून, यापुढेही कांद्याच्या दरात वाढ पाहावयास मिळणार आहे.
निर्यात बंदी हटविल्याने बळीराजा सुखावला
दि. ९ रोजी झालेल्या बाजारात कांदा नंबर १ रुपये १३०० ते १९६०, कांदा नंबर २ रुपये ९५० ते १३००, कांदा गोल्टी ४०० ते ९५० पर्यंत दर निघाले होते. निर्यात बंदी हटविल्याने बळीराजा सुखावला होता.