पोलीस असल्याचे भासवून सहा तोळ्यांचे दागिने लंपास
By admin | Published: December 22, 2014 12:06 AM2014-12-22T00:06:32+5:302014-12-22T00:08:05+5:30
वृद्ध दाम्पत्याला गंडा : मलकापूर येथे ढेबेवाडी फाट्यानजीक घटना
कऱ्हाड : पोलीस असल्याचा बनाव करून वृद्ध दाम्पत्याकडील सुमारे दीड लाख किंमतीचे सहा तोळ्यांचे दागिने लंपास करण्यात आले. मलकापूर येथील ढेबेवाडी फाट्यानजीक रविवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
सासपडे, ता. कडेगाव येथील उत्तम गणपती पोळ (वय ७५) व त्यांच्या पत्नी भागिर्थी (वय ७२) हे दोघे मलकापूर येथील ढेबेवाडी फाट्यानजीक आर्यभूषण कॉम्प्लेक्समध्ये आपल्या मुलांकडे राहत आहेत. रविवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास उत्तमराव पोळ हे रुग्णालयात जाण्यासाठी पत्नी भागिर्थी यांच्यासमवेत नजीकच असलेल्या मोरया कॉम्प्लेक्समध्ये निघाले होते. त्यावेळी पाठीमागून दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांना अडविले. त्याच दरम्यान समोर असलेल्या एका इमारतीमधून अन्य एकजण चालत आला. त्या तिघांनी पोळ दाम्पत्याकडे चौकशी सुरू केली. तसेच पुढे चाकू हल्ला करून लूट झाली असल्याचे त्यांनी पोळ यांना सांगितले. आम्ही पोलीस असल्याचे सांगून त्यांच्याकडील दागिने व मोबाईल काढून घेतले.
संबंधितांनी भागिर्थी पोळ यांच्या गळ्यातील सुमारे सहा तोळे वजनाचे डोरले व एक बोरमाळ स्वत:कडे घेऊन कागदात गुंडाळून कागदाची पुडी भागिर्थी पोळ यांच्याकडे दिली. मोबाईलही उत्तमराव पोळ यांच्याकडे देऊन तिघेही निघून गेले. काही अंतर पुढे गेल्यानंतर भागिर्थी यांनी कागदाची पुडी उघडली असता त्यामध्ये सहा तोळे वजनाचे डोरले नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
पोलीस असल्याचा बनाव करून संबंधितांनी आपली फसवणूक केली असल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांनी रात्री उशिरा याबाबत कऱ्हाड शहर पोलिसांत फिर्याद दिली. (प्रतिनिधी)