पुनवडीतील मंदिरात लंडनच्या घंटेचा नाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2019 11:48 AM2019-04-01T11:48:12+5:302019-04-01T11:50:20+5:30
जावळी तालुक्यातील पुनवडीत भैरवनाथ मंदिरासमोर शंभर किलो वजनाची ऐतिहासिक घंटा आढळून आली. १८८१ मध्ये लंडनमधील जिलेट ब्लेंड कंपनीने ही घंटा तयार केली होती.
सातारा : जावळी तालुक्यातील पुनवडीत भैरवनाथ मंदिरासमोर शंभर किलो वजनाची ऐतिहासिक घंटा आढळून आली. १८८१ मध्ये लंडनमधील जिलेट ब्लेंड कंपनीने ही घंटा तयार केली होती.
या घंटेचा १४० वर्षांपूर्वी लंडन ते पुनवडी झालेला मनोरंजक प्रवास कला व वाणिज्य महाविद्यालयाचे इतिहास विषयाचे प्रा. गौतम काटकर, संशोधक विद्यार्थी महेश गुरव, मिरज इतिहास संशोधन मंडळाचे अध्यक्ष मानसिंगराव कुमठेकर यांनी उलगडला.
पुनवडी गावाजवळील भैरवनाथाच्या मंदिरासमोर एका झाडावर भली मोठी घंटा टांगली आहे. घंटेचा परीघ सुमारे ८० इंच आहे. ही घंटा पंचधातूंपासून तयार केली आहे. या घंटेकडे कोणाचे लक्ष नव्हते. प्रा. काटकर, महेश गुरव आणि मानसिंगराव कुमठेकर यांनी पुनवडी येथे जाऊन घंटेची पाहणी केली. त्यावेळी ही घंटा ऐतिहासिक असल्याचे निदर्शनास आले.
या घंटेवर जिलेट ब्लेंड अँड कंपनी क्रायडॉन असे उठावदार इंग्रजी अक्षरात कोरले आहे. त्याचबरोबर घंटा तयार केल्याचे १८८१ असे लिहिण्यात आले आहे. तर एका बाजूला मारुती लक्ष्मण पारटे अशी अक्षरे ठिपक्यांमध्ये कोरण्यात आली आहेत.
या घंटेचा अभ्यास केला असता मनोरंजक माहिती समोर आली. १४० वर्षांपूर्वी या घंटेचा लंडन ते पुनवडी असा झालेला प्रवास उलगडला गेला. ही घंटा लंडन शहराजवळील क्रायडॉन या शहरात तयार केली. ही कंपनी चर्च आणि अन्य इमारतीवर असणाऱ्या मनोऱ्यातील घड्याळे आणि चर्चमध्ये वापरण्यात येणाऱ्या घंटेसाठी प्रसिद्ध होती.
या कंपनीने जगातील अनेक महत्त्वाच्या ठिकाणी वीस टनांहून अधिक वजनाच्या स्मारक घंटा बनवून दिल्या आहेत. अमेरिका, इंग्लड, जर्मनी यासह अन्य युरोपीयन राष्ट्रांत अनेक मोठ्या चर्च आणि स्मारकस्थळी या कंपनीच्या घंटा बसविण्यात आल्या आहेत.
याचवेळी गावातील भैरवनाथाच्या मंदिरासाठी घंटा आणण्याचा गावकऱ्यांचा विचार सुरू होता. मारुती पारटे यांनी जहाजावरून विकण्यास आलेली ही भलीमोठी घंटा मंदिरासाठी विकत घेतली. शंभर किलो वजनाची ही घंटा बैलगाड्यावर टाकून गावात आणण्यात आली. त्यानंतर ती भैरवनाथाच्या मंदिरात बसविण्यात आली. ही घंटा पाहण्यासाठी इतिहासप्रेमी भेट देत आहेत.
जहाजातून वाहतूक
ही घंटा प्रामुख्याने चर्चसाठीच बनविण्यात आली होती. ती लंडनहून जहाजाने भारतात मुंबईत आली. यावेळी पुनवडी गावातील अनेक लोक मुंबईत कापड गिरण्या आणि बंदरावरील गोदीत कामास होते. ही घंटा विकण्यासाठी आल्यावर मुंबईत आलेल्या मारुती लक्ष्मण पारटे यांच्या निदर्शनास आली.