‘कोरोना’पेक्षा एकटेपणा अधिक भीतीदायक...भारतात आल्याचे फार मोठे समाधान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2020 12:47 AM2020-03-01T00:47:05+5:302020-03-01T00:48:49+5:30
चीनमध्ये हॉस्पिटलमधून हा आजार जास्त पसरतो आहे. इतर आजारांवर हॉस्पिटलऐवजी घरीच उपाय केले जातात. तेथील डॉक्टरांना आपली भाषा समजत नसल्याचीही मोठी अडचण आहे. - अश्विनी पाटील, चीनमध्ये अडकलेली भारतीय महिला
दीपक शिंदे ।
सातारा : चीनमध्ये आलेला कोरोना व्हायरस हा जीवघेणा आहे. पण, तो बरादेखील होऊ शकतो. आत्तापर्यंत १२ ते १५ हजार लोक बरे झाले आहेत. पण मृत्यू झालेल्या लोकांची संख्या जास्त असल्यामुळे हा आजार केवळ जीवघेणाच आहे, असे आपल्याला वाटते. परदेशात असल्यामुळे एकटेपणा काय असतो याची आम्हाला जाणीव झाली. त्याबरोबरच परकेपणा कायम जाणवत राहिला. भारतात असतो तर काहीच काळजी नव्हती त्यावर कशीही मात केली असती. त्यामुळे कोरोनापेक्षा एकटेपणा अधिक भीतीदायक असल्याचे मत चीनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिक अश्विनी पाटील यांनी व्यक्त केले.
प्रश्न : चीनमध्ये सध्या काय परिस्थिती आहे ?
उत्तर : चीनमधील परिस्थिती अजून जैसे थे आहे. व्हायरस पसरतो आहे. केवळ चीनपुरता मर्यादित न राहता तो आता साऊथ कोरिया आणि इराणमध्येही पसरतो आहे. युरोपिय देशांमध्ये व्हिसाची गरज नसल्याने लोक एका देशातून दुसऱ्या देशात प्रवास करतात. त्यामुळे हा आजार अधिक पसरतो आहे.
प्रश्न : चीनमध्ये अजून किती भारतीय आहेत?
उत्तर : भारतीय दूतावासाने जेवढ्या लोकांना भारतात परत पाठविता येईल. तेवढ्या सगळ्यांना पाठविण्याचा प्रयत्न केला आहे. वुहानमधील बहुतेक लोक भारतात आले आहेत. मात्र, चीनच्या इतर भागातही अजून काही भारतीय असण्याची शक्यता आहे. त्यांनाही भारतात आणण्यासाठी दूतावास प्रयत्न करत आहे.
प्रश्न : खाद्यपदार्थांची उपलब्धता आहे का ?
उत्तर : घरातून बाहेर पडण्याची परवानगी नाही. पण, चीन सरकार सुपर मार्केटच्या माध्यमातून घरापर्यंत उपलब्ध पदार्थ पोहोचविण्याची जबाबदारी घेते.
१ महिना ३ दिवस दिव्यत्वाची प्रचिती
चीनमध्ये मी एक महिना आणि ३ दिवस एकटी होते. सकाळी उठले की नाष्ट्याची तयारी, स्वयंपाक तयार करणे, व्यायाम करणे, आई - वडील, पती, नातेवाईक यांच्याशी बोलणे यामुळे वेळ जात होता. तरीही भारतात कधी येणार याची हुरहूर लागून राहिलेली होती. जुने चित्रपट पाहणे आणि चीनमध्ये असलेल्या भारतीयांशी काय हवे नको, याबाबत चर्चा करणे असा दिनक्रम होता. आम्ही चीनमध्ये असलेले लोक एकमेकांची काळजी घेत होतो.
नव्याने काही मित्र-मैत्रिणी तयार झाल्या. कोरोना व्हायरस हा शरीरात शिरल्यानंतर त्याला तुम्हाला मारायचे नसते तर तुमच्या शरीरात राहून जगायचे असते. पण, या व्हायरसमुळे ह्युमिनिटी कमी होते आणि न्यूमोनिया होतो. जर कडक ऊन असेल तर हा व्हायरस फार काळ जगू शकत नाही.