शंभर फुटावर दबा धरून बसलाय काळ !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 04:37 AM2021-02-12T04:37:28+5:302021-02-12T04:37:28+5:30
सातारा : सातारा बसस्थानकात बुधवारी पाच गाड्या डोळ्यादेखत जळताना हजारो प्रवाशांनी पाहिल्या. त्यापासून अवघ्या तीनशे फुटावर आगारातील डिझेल पंप ...
सातारा : सातारा बसस्थानकात बुधवारी पाच गाड्या डोळ्यादेखत जळताना हजारो प्रवाशांनी पाहिल्या. त्यापासून अवघ्या तीनशे फुटावर आगारातील डिझेल पंप आहे. या पंपापासून वीस फुटावर आणखी बंद अवस्थेतील शिवशाही गाड्या उभ्या आहेत. त्याभोवती मोठ्या प्रमाणावर कागदी कचरा साठला आहे. अनेक प्रवासी रात्री लघुशंकेसाठी त्याच्या मागे जातात. एखाद्याने सिगारेट पेटवून काडी टाकली, तर मोठी दुर्घटना घडू शकते.
कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर सार्वजनिक वाहतूक बंद करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. त्यामुळे एसटीची चाकं थांबून, मार्च महिन्यात सातारा मध्यवर्ती बसस्थानकात सर्वच गाड्या लावण्यात आल्या. तत्पूर्वी महामंडळात साधी, निमआराम, एसटीच्या तसेच खासगी शिवशाही गाड्या धावत होत्या. या सर्वच गाड्या सातारा मध्यवर्ती बसस्थानकात उभ्या करण्यात आल्या होत्या. खासगी शिवशाही गाड्यांच्या संबंधित कंपन्यांनी या ठिकाणी देखभालीसाठी एखाद्या व्यक्तीची नेमणूक केली आहे. या गाड्या गेल्या अकरा महिन्यांपासून एकाच ठिकाणी उभ्या आहेत. त्यातील अनेक गाड्यांचे दरवाजे उघडे आहेत. त्यामुळे आत कोणीही जाऊन बसू शकतो. अशाच प्रकारे बुधवारी अज्ञाताने गाडी पेटवल्यामुळे पाच गाड्या जळून खाक झाल्या.
शिवशाहीच्या पाच गाड्या पेटल्या. तेथून अवघ्या शंभर फुटावर एसटीचा डिझेल पंप आहे. पोलीस, एसटीचे कर्मचारी तसेच प्रवाशांनी बंद गाडी बाजूला केल्याने पुढील नुकसान टळले. मात्र या घटनेतून एसटी प्रशासनाने वेळीच सावध होण्याची गरज आहे. अजूनही ठिकठिकाणी काळ दबा धरून बसला आहे. एसटीच्या डिझेल पंपापासून अवघ्या वीस फुटावर आणखी तीन गाड्या बंद अवस्थेत आहेत. त्यांच्या भोवताली कचरा, कागद मोठ्या प्रमाणावर पडलेले आहेत. रात्रीच्या वेळी लांब पल्ल्याच्या गाड्यांतील प्रवासी या गाडीच्या पाठीमागे लघुशंकेसाठी जातात. एखाद्या प्रवाशाने पेटलेली सिगारेट, गाडी टाकली, तर या गाड्याही पेट घेऊ शकतात अन् डिझेल टाकीने पेट घेतला, तर खूपच मोठी दुर्घटना घडू शकते. बसस्थानकात दररोज हजारो प्रवाशांची वर्दळ असते. त्याचप्रमाणे आगारात शेकडो कर्मचारी काम करत असतात.
चौकट :
भंगारातील टायरचे ढीग
तेथून काही अंतरावरच विभागीय कार्यशाळा आहे. त्याठिकाणी खराब झालेले टायर मोठ्या संख्येने टाकले आहेत. हे टायरही भविष्यात दुर्घटनांना जबाबदार ठरू शकतात. त्यामुळे वेळीच उपाययोजना करण्याची गरज आहे.
चौकट :
प्रत्येकाने एक बाटली पाणी टाकले असते तर...
सातारा बसस्थानकात बुधवारी सायंकाळी पाचच्या सुमारास शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालये सुटल्याने गावी जाणाऱ्या प्रवाशांमुळे वर्दळ वाढली होती. त्यातच गाडीने पेट घेतला. प्रवासी एवढे होते की, प्रत्येकाने एक-एक बाटलीभर पाणी टाकले असते तरी अनर्थ टळला असता. मात्र प्रवाशांनी मोबाईलवर चित्रीकरण करणे अन् स्टेटसवर टाकण्यालाच प्राधान्य दिले.
फोटो
प्रुफ/११.०२.२०२१/११जावेद०७
सातारा मध्यवर्ती बसस्थानकात उभ्या असलेल्या या बंद शिवशाही गाड्यांपासून अवघ्या वीस फुटावर डिझेलचा पंप आहे. (छाया : जावेद खान)