दुनियादारी बघणाऱ्या सातारा पोलिसांची अशीही यारी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2018 03:43 PM2018-07-30T15:43:48+5:302018-07-30T15:50:37+5:30
कर्तव्य बजावताना अपघाती मृत्यू झालेल्या आणि महामार्गावर अपघाताचा पंचनामा करताना झालेल्या अपघातात गंभीर जखमी असलेल्या पोलीस कॉन्स्टेबलला त्यांच्या बॅचमेटस्नी आर्थिक मदत केली. दुनियादारी बघणाऱ्या पोलिसांची ही यारी सर्वांसाठी आदर्शवत अशीच आहे.
सातारा : कर्तव्य बजावताना अपघाती मृत्यू झालेल्या आणि महामार्गावर अपघाताचा पंचनामा करताना झालेल्या अपघातात गंभीर जखमी असलेल्या पोलीस कॉन्स्टेबलला त्यांच्या बॅचमेटस्नी आर्थिक मदत केली. दुनियादारी बघणाऱ्या पोलिसांची ही यारी सर्वांसाठी आदर्शवत अशीच आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, दहिवडी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेला अजित उत्तम टकले हा टपालकामी पोलीस मुख्यालयात आला होता. येथील काम उरकून दहिवडीला परत जात असताना त्याचा पुसेगाव रस्त्यावर अपघात झाला. अपघात इतका भीषण होता की त्याचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात सुमारे एक महिन्यापूर्वी झाला.
अजितची २०१४ च्या बॅचचा. त्याची घरची परिस्थिती अगदीच बेताची त्यातच कर्तृत्ववान मुलाचं असं जाणं त्याच्या कुटुंबीयांसाठी मोठा धक्का होता. अजितच्या अंत्यविधी प्रसंगात असतानाच त्यांचा आणखी एक बॅचमेट अपघातात गंभीर जखमी असून, कोमात असल्याची माहिती समोर आली.
सातारा तालुका पोलीस ठाण्यात कार्यरत असलेला अमोल कांबळे बोरगाव पोलीस ठाणे हद्दीत झालेल्या अपघाताचा पंचनामा करण्यासाठी वरिष्ठांसह गेला होता. पंचनामा सुरू असताना मागून आलेल्या बसने या दोघांनाही जोरदार धडक दिली. यात वरिष्ठ पोलीस जागीच ठार झाले तर अमोल गंभीर जखमी झाला होता. हा अपघातही काही महिन्यांपूर्वीच झाला होता.
आपल्या दोन्ही मित्रांच्या कुटुंबीयांवरील प्रसंगाचा अंदाज घेऊन यावर मार्ग काढण्यासाठी त्यांचे सर्व बॅचमेट एकत्र आले. प्रत्येकाने आपापल्या पगारातून रक्कम काढण्याचे ठरविले आणि अवघ्या काही तासांत १ लाख ३५ हजार रुपये जमा झाले. ही सर्व रक्कम त्यांनी अजित आणि अमोल यांच्या कुटुंबीयांना दिली.
कोमात असलेला अमोल आता शुद्धीवर आला आहे. मात्र, अपघातामुळे उद्भवलेल्या शारीरिक जखमा भरेपर्यंत त्याच्यावर दवाखान्यातच उपचार सुरू राहणार आहेत. तो अद्यापही खासगी दवाखान्यात उपचार घेत आहे. बॅचमेटच्या या आवाहनामुळे एकाच्या वारसाला तर दुसऱ्याच्या कुटुंबीयांना आधार मिळाला.