जावळीतील संवेदनशील गावांवर नजर
By Admin | Published: August 3, 2015 09:50 PM2015-08-03T21:50:20+5:302015-08-03T21:50:20+5:30
भयमुक्त वातावरणात निवडणूक व्हावी : पोलिसांना सतर्क राहण्याचे आदेश
कुडाळ : जावळी तालुक्यातील ५६ ग्रामपंचायतींपैकी ३३ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. मंगळवारी २३ ग्रामपंचायतींसाठी मतदानप्रक्रिया पार पडत आहे. त्यादृष्टीने निवडणुकीची पूर्ण तयारी झाली असून, निवडणूक होत असलेल्या गावांमधील राजकीय हालचालींवर प्रशासनाची करडी नजर आहे. तर २३ पैकी ७ ग्रामपंचायती या संवेदनशील असल्यामुळे अशा गावांवर पोलिसांनी नजर ठेवून सतर्क राहण्याचे आदेश तहसीलदार रणजित देसाई यांनी दिले आहेत.तालुक्यात होत असलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका गावांतर्गत असलेल्या गटातटांमध्ये होताना दिसतात. त्यामुळे गावांतर्गत गटतट हे प्रतिष्ठेने निवडणूक लढविताना दिसून येतात. त्यामुळे प्रसंगी वादविवादाचे प्रसंगदेखील ओढावतात. गेल्या निवडणुकीत वाद झाल्यामुळे काही गावांमधील ग्रामस्थांनी तहसीलदार देसाई यांना समक्ष भेटून गत निवडणुकीत झालेल्या प्रकाराची माहिती दिली व भयमुक्त वातावरणात निवडणूक व्हावी, यासाठी शक्य त्या उपाययोजना प्रशासनाने कराव्यात, अशी मागणी केली.त्यादृष्टीने निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार देसाई यांनी सर्व निवडणूक कर्मचाऱ्यांना निवडणूक आयोगाने जी नियमावली केली आहे, त्याप्रमाणे मतदान करून घ्यावे, तसेच पोलीस प्रशासनाला देखील सतर्क राहून संवदेनशील गावांवर नजर ठेवून राहण्याचे आदेश दिले. (प्रतिनिधी)
तालुक्यात ज्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत त्या शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासनाने योग्य ती घबरदारी घेतली आहे. त्यानुसार सर्व यंत्रणेला सूचना दिल्या गेल्या आहेत.
- रणजित देसाई, तहसीलदार, जावळी.
तालुक्यातील होणाऱ्या ग्रामपंचायती निवडणुका या भयमुक्त वातावरणात पार पडल्या जाव्यात, तसेच संवेदनशील गावांसह राजकीयदृष्ट्या प्रतिष्ठेची निवडणूक होत असलेल्या गावांवर आमची नजर असून, तक्रार आल्यास कायदेशीर कारवाई केली जाणार.
- समाधान चवरे, सहायक पोलीस निरीक्षक