घराच्या खिडकीकडे पाहत पिस्तूल रोखले; कोंडवेतील घटना, तीन तरुणांना अटक
By दत्ता यादव | Published: August 31, 2023 07:39 PM2023-08-31T19:39:43+5:302023-08-31T19:39:49+5:30
दि. ३० रोजी रात्री पठाण यांनी सातारा तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली
सातारा : कोंडवे, ता. सातारा येथील व्यावसायिक कादर बशीर पठाण (वय ३८) यांच्या घराच्या खिडकीकडे पिस्तूल रोखून कुटुंबीयांच्या जीवितास धोका निर्माण करणाऱ्या तिघांना सातारा तालुका पोलिसांनी तातडीने अटक केली. ही घटना दि. २७ रोजी रात्री सव्वादहा वाजता घडली होती.
अश्पाक मुबारक शेख (वय २१, रा. राजसपुरा पेठ, सातारा), मोहनीश चंद कुरेशी (वय २३, रा. शुक्रवार पेठ, सातारा), मेहताब जब्बार शेख (वय २१, रा. केसरकर पेठ, सातारा) अशी पोलिसांनी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कादर पठाण हे स्क्रॅप व्यावसायिक असून, ते कोंडवे येथील मायगोल्ड कंपनीच्या पाठीमागे राहतात. दि. २७ रोजी रात्री १०ः१५ च्या सुमारास वरील संशयित हे त्यांच्या घराजवळ गेले. अश्पाक आणि मोहनीश याने त्यांच्या खिडकीकडे पाहत पिस्तूल रोखून धरले. त्यामुळे पठाण यांच्या कुटुंबाच्या जीवितास धोका निर्माण झाला. हा सारा प्रकार पठाण यांच्या घरात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला.
त्यानंतर बुधवार, दि. ३० रोजी रात्री पठाण यांनी सातारा तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिस निरीक्षक विश्वजित घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार राजू शिखरे यांनी तातडीने वरील तीन संशयितांना अटक केली. न्यायालयासमोर त्यांना हजर केले असता न्यायालयाने त्यांना तीन दिवस पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, नेमक्या कोणत्या कारणातून हा प्रकार घडला, हे अद्याप समोर आले नसून, संशयित आरोपींकडे पोलिस कसून चाैकशी करीत आहेत.