सातारा-कोरेगाव दरम्यान महामार्गाच्या कामाला खो!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:40 AM2021-04-27T04:40:12+5:302021-04-27T04:40:12+5:30

कोरेगाव : सातारा-लातूर राष्ट्रीय महामार्गाचे सातारा ते कोरेगाव दरम्यानचे काम अत्यंत संथगतीने आणि नियोजनशून्य पद्धतीने सुरू आहे. १८ ...

Lose highway work between Satara-Koregaon! | सातारा-कोरेगाव दरम्यान महामार्गाच्या कामाला खो!

सातारा-कोरेगाव दरम्यान महामार्गाच्या कामाला खो!

Next

कोरेगाव : सातारा-लातूर राष्ट्रीय महामार्गाचे सातारा ते कोरेगाव दरम्यानचे काम अत्यंत संथगतीने आणि नियोजनशून्य पद्धतीने सुरू आहे. १८ पैकी केवळ १० किलोमीटर अंतराचा मार्ग सिमेंट काँक्रीटचा तयार झाला असून, उर्वरित ठिकाणी मार्गाची पूर्णत: बिकट अवस्था झालेली आहे. वाहनधारकांना या रस्त्यावर वाहन चालविणे म्हणजे एक प्रकारची शिक्षाच आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

क्षेत्र माहुली ते खावलीपर्यंतच्या अडीच किलोमीटर अंतराच्या प्रवासात जीवघेणा रस्ता पाहून अनेकांच्या काळजात धडकी भरत आहे. पूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असलेला हा मार्ग आता राष्ट्रीय महामार्गामध्ये रुपांतरित झाल्याने तो राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरण आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सार्वजनिक उपक्रमाकडे संयुक्तरित्या हस्तांतरीत झाला आहे. आंध्रप्रदेश स्थित ठेकेदार कंपनीने जसे आपल्याला सोयीस्कर होईल तसे आणि जमेल तसे चौपदरीकरणाचे काम सातारा ते कोरेगावदरम्यान केले आहे, असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. हे काम करीत असताना त्याचा दर्जाही पाहिला गेला नाही.

महामार्गाच्या कामाबाबत गेल्या दोन वर्षांपासून जिल्हा प्रशासनाकडे सातत्याने तक्रारी होत आहेत. मध्यंतरीच्या काळात तर वाढत्या अपघातांमुळे ठेकेदार कंपनीच्या जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करण्याची मागणी केली गेली होती. कोरेगावातील प्रांत कार्यालयात झालेल्या अनेक बैठकांमध्ये हमरीतुमरीवरचे प्रसंग आले होते. तरीदेखील प्राधिकरण अद्याप या महामार्गाच्या कामाबाबत दक्ष नाही, ही वस्तुस्थिती आहे.

सातारा येथील बाँबे रेस्टॉरंट चौक ते माहुली पुलापर्यंत अद्याप महामार्गाचे काम सुरूच झाले नाही. संगमनगरपासून पुढे सर्वत्र पडलेल्या खड्ड्यांमध्ये काँक्रीट ओतण्यात आले आहे. काही ठिकाणी मोठे चढ-उतार ठेवण्यात आले आहेत. मोठ्या प्रमाणावर धुळीचे साम्राज्य आहे, अशी परिस्थिती असताना प्राधिकरणाचे अधिकारी नेमके काय सुपरव्हिजन करतात, हा प्रश्‍न निर्माणझाला आहे. खावलीपासून शिरढोण फाटापर्यंत सिमेंट काँक्रीटचा महामार्ग तयार झाला आहे. मात्र, तो शास्त्रोक्त पद्धतीने झालेला नाही, त्रिपुटी व भिवडी येथील पुलांची कामे संथगतीने सुरू असून, रात्रीच्यावेळी तेथे अपघात होत आहेत.

शिरढोण फाटा ते कोरेगाव शहरातील आझाद चौक दरम्यान रस्ता अस्तित्वात आहे काय? अशी परिस्थिती आहे. मार्केटयार्डनजीक तर रस्ताच शिल्लक राहिलेला नाही. एकंदरीत जिल्हा प्रशासनाने याविषयात लक्ष घालून सातारा ते कोरेगाव दरम्यानचा महामार्ग लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी आदेश द्यावेत, अशी मागणी होत आहे.

चौकट :

रुग्णवाहिका चालकांना पुरस्कार द्यायला हवाच...

कोरेगाव, खटाव आणि माण तालुक्यांतील अत्यवस्थ कोरोनाबाधित रुग्णांना सातारा येथील जंबो कोविड सेंटरसह अन्य रुग्णालयांत नेण्यासाठी रुग्णवाहिका चालक याच मार्गाचा वापर करतात. खावली ते क्षेत्र माहुलीदरम्यान केवळ सायरन लावून त्यांना मार्ग मोकळा मिळत नाही, त्यासाठी मोठमोठ्याने अनाऊसमेंट देखील करावी लागत आहे. सोमवारी दुपारी कोरेगाव नगरपंचायतीच्या रुग्णवाहिका चालकाला त्याचा चांगलाच प्रत्यय आला. एकूणच खराब मार्गावर रुग्णवाहिका चालवून ते एकप्रकारे विक्रमच करीत आहेत, त्यामुळे त्यांना पुरस्कार द्यायलाच हवा.

चौकट :

अडीच महिन्यांत अडीच किलोमीटर रस्ता...

कोरेगाव येथे गेल्या आठवड्यात कोरोनाविषयक आढावा बैठक झाली. या बैठकीस विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्यासह आमदार शशिकांत शिंदे व आमदार महेश शिंदे उपस्थित होते. त्याचबरोबर जिल्हाधिकारी शेखरसिंह, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा हे एकाच वाहनाने या बैठकीसाठी साताऱ्यातून कोरेगावकडे गेले होते. त्यांच्या वाहनाला देखील क्षेत्रमाहुली-खावली दरम्यान थांबावेच लागले, असे प्रत्यक्षदर्शिनी सांगितले. एकूणच लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे अडीच महिन्यांत अडीच किलोमीटर अंतर महामार्गाचे काम होऊ शकत नाही, हेच मोठे दुर्दैव आहे.

फोटो आहे..

Web Title: Lose highway work between Satara-Koregaon!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.