उंडाळे विभागात शेतकऱ्यांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:31 AM2021-04-29T04:31:35+5:302021-04-29T04:31:35+5:30
कऱ्हाड : कऱ्हाड दक्षिण विभागात सोमवारी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. या वादळी वाऱ्यामुळे मनव येथे धनाजी काकडे ...
कऱ्हाड : कऱ्हाड दक्षिण विभागात सोमवारी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. या वादळी वाऱ्यामुळे मनव येथे धनाजी काकडे यांच्या जनावरांच्या शेडवरील पत्रे जनावरांच्या अंगावर पडल्याने चार जनावरे जखमी झाली. येवती, पाटीलवाडी, शेवाळेवाडी, म्हासोली, येळगाव, भुरभुशी, गोटेवाडी यासह संपूर्ण परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने झोडपून काढले, तर टाळगाव, घोगाव, ओंड, मनव, उंडाळे परिसरात हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. वादळी वाऱ्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. आंब्याचा हंगाम सुरू असून, या वादळी वाऱ्याने शेतातील आंबे मोठ्या प्रमाणात झडले आहेत.
बनपुरी, रुवलेत ३६ कोरोनाबाधित आढळले
सणबुर : येराडपाठोपाठ पाटण तालुक्यातील बनपुरी आणि रुवले या दोन गावांत तब्बल ३६ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे या दोन्ही गावात संसर्ग वाढू नये, यासाठी तालुका प्रशासनाने कंबर कसली असून, स्थानिक प्रशासनाची मात्र झोप उडाली आहे. ढेबेवाडी विभागातील मोठे कार्यक्षेत्र असलेल्या बनपुरी या ग्रामपंचायतअंतर्गत येणारी कंकवाडी, देसाईवस्ती, चांदेकरवस्ती या ठिकाणी कोरोनाने थैमान घातले आहे. या तीन छोट्या वस्त्यांमध्ये २६ कोरोना रुग्ण आहेत, तर त्यांच्या संपर्कात अनेक जण आले असूनही ग्रामस्थ कोरोना चाचणी करण्यास प्रतिसाद देत नाहीत. त्याबरोबरच रुवले येथे छोट्याशा वस्तीत दहा कोरोना रुग्ण आढळले आहेत.
मंद्रुळकोळेत टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा उत्साहात
सणबूर : मंद्रुळकोळे व मंदुळकोळे खुर्द, ता.पाटण येथील युवकांनी आयोजित केलेल्या एमपीएल टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा उत्साहात पार पडल्या. दोन दिवस चाललेल्या या स्पर्धेत के. स्पोर्टस संघाने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले, तर द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक जान्हवी क्रिकेट स्पोर्टस या संघाने पटकावले. या स्पर्धेत एकूण आठ संघांचा सहभाग होता. बक्षीस वितरण समारंभ जिल्हा काँग्रेसचे सचिव अभिजीत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सरपंच अमोल पाटील, उपसरपंच दीपक काटकर, स्वप्निल शेवाळे, ग्रामविकास अधिकारी संतोष घोडे, दत्तात्रय काटकर, दीपक शेलार, सचिन सुतार, घनश्याम चोरमारे, संजय देसाई, अमर पाटील, संतोष पाटील, राजू रोडे, रणजीत माने उपस्थित होते.
तांबवे विभागात वीजपुरवठा वारंवार खंडित
तांबवे : विभागात वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्यामुळे वीजग्राहक हैराण झाले आहेत. वादळाचा तडाखा बसल्यानंतर अनेक गावांचा वीजपुरवठा खंडित झाला. काही ठिकाणी बिघाड झाल्यामुळे ग्रामस्थांना अंधारात राहावे लागले. पावसाळ्यात तर ग्रामीण भागात वारंवार बिघाड होऊन खंडित विजेचा सामना करावा लागतो. दोन दिवसांपूर्वी विभागात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. त्यावेळी सुपने, तांबवे, किरपे गावातील वीजपुरवठा रात्रभर खंडित झाला होता. त्यामुळे ऐन उकाड्यात ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागला.