सोसाट्याचा वाऱ्यामुळे वीजवितरणाचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:40 AM2021-05-18T04:40:30+5:302021-05-18T04:40:30+5:30
नागठाणे : चक्रीवादळाच्या थैमानामुळे नागठाणे आणि परिसरात रविवारी जोराचे वारे आणि पावसाने चांगलीच हजेरी लावली. हवामान खात्याच्या अंदाजामुळे राज्यभरात ...
नागठाणे : चक्रीवादळाच्या थैमानामुळे नागठाणे आणि परिसरात रविवारी जोराचे वारे आणि पावसाने चांगलीच हजेरी लावली. हवामान खात्याच्या अंदाजामुळे राज्यभरात बऱ्याच ठिकाणी वादळाचा जोराचा तडाखा बसणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले होते.
त्यानुसार रविवारी दिवसभरात नागठाणे (ता. सातारा) परिसरात जोराचे वारे आणि दमदार पाऊस झाला. संपूर्ण दिवसभरात सकाळपासूनच हवामानात चांगलाच बदल झाल्यामुळे सोसाट्याचा वारा वाहण्यास सुरुवात झाली तसेच पावसानेदेखील चांगलीच हजेरी लावली. नागठाणे परिसरातील वीजवितरणच्या कामकाजावर त्याचा चांगलाच परिणाम झाल्याचे दिसून आले. बऱ्याच ठिकाणी शेतामध्ये काढणीस आलेल्या उन्हाळी भुईमुगावर याचा परिणाम झाल्याने बळिराजाची चांगलीच धांदल उडाली. परिसरात सोसाट्याच्या वाऱ्यामुळे काहीठिकाणी मोठमोठाले वृक्ष उन्मळून पडल्यामुळे वीज वितरणाच्या बऱ्याच ठिकाणच्या लाईनवरील तारा तुटल्या. या संपूर्ण त्रासामुळे वीज वितरणचे बरेच नुकसान झाले असल्याचे दिसून आले तसेच भागातील संपूर्ण वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे संपूर्ण वीजपुरवठा पुन्हा सुरळीत करताना वीज वितरणाच्या कर्मचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागल्याचे दिसून आले.
संपूर्ण दिवसभरात परिसरातील बऱ्याच ठिकाणी ‘वीजवितरण’चे नागठाणे विभागाचे सहायक अभियंता अजित ढगाळे यांनी रविवारी कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन परिसरातील बऱ्याच ठिकाणच्या तुटलेल्या तारा पुन्हा जोडण्याची कामे युद्धपातळीवर घेऊन सायंकाळी ६ वाजेपर्यंत पूर्ण करून संपूर्ण भागात खंडित झालेला वीजपुरवठा सुरळीत करून दिला. त्यामुळे भागातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले. सोसाट्याचा वारा दिवसभर सुरूच होता.