यंदा भरपूर आमरस; हापूस १०० रुपये किलो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:39 AM2021-05-13T04:39:41+5:302021-05-13T04:39:41+5:30
सातारा : जिल्ह्यात यंदा केशर, हापूससह गावरान आंबे विक्रीसाठी आले असून, लॉकडाऊनमुळे मागणी कमी झाली आहे. त्यामुळे माल चांगला ...
सातारा : जिल्ह्यात यंदा केशर, हापूससह गावरान आंबे विक्रीसाठी आले असून, लॉकडाऊनमुळे मागणी कमी झाली आहे. त्यामुळे माल चांगला असूनही दर मात्र कमी झाले आहेत. हापूस आंबा तर १०० ते २०० रुपये किलोपर्यंत मिळत आहे. दर कमी झाल्याने यंदा भरपूर आमरस, अशीच स्थिती आहे.
जिल्ह्यात कर्नाटक तसेच कोकणातून विविध प्रकारचा आंबा येतो. तसेच गावठी आंब्याचीही आवक असते. यावर्षी जिल्ह्यात दोन महिन्यांपासून आंबा येण्यास सुरुवात झाली; पण सद्य:स्थितीत आंब्याची आवक अधिक आहे. कर्नाटकातून कर्नाटक हापूस आंबा येत आहे. त्याचबरोबर कोकणातील रत्नागिरी हापूस, देवगडचा हापूस आंबा येत आहे. नागरिकांची मागणी अधिक करुन देवगड हापूसला आहे. कोकणातून आंब्याच्या दररोज पेट्याच्या पेट्या येत आहेत. काही व्यापारी तर मागणीनुसार घरपोहोच आंबा करताना दिसून येत आहेत.
सध्या बाजारपेठेत आंब्याची आवक चांगली आहे. मात्र, कोरोनामुळे लॉकडाऊन असल्याने ग्राहकच मोठ्या प्रमाणात नाही. त्यामुळे फायद्याचा विचार न करता आंब्याच्या पेटीची विक्री करावी लागत आहे. कारण, पक्व झालेला आंबा उष्णतेमुळे लवकर बाद होतो. संभाव्य नुकसान टाळण्यासाठी नफ्यापेक्षा विक्री करण्याकडे व्यापाऱ्यांचा कल दिसून येत आहे.
चौकट :
हापूस रत्नागिरी १५० रुपये किलो
हापूस कर्नाटक १०० रुपये किलो
आंब्याची रिटेल किंमत किलो
केशर १५० रुपये
पायरी १७५ रुपये
गावरान ५० रुपये
मागील वर्षीचे दर
हापूस २०० रुपये किलो
पायरी २२५ रुपये किलो
गावरान ४० ते ६० रुपये किलो
होलसेल किंमत किलो
केशर १२५ रुपये
पायरी १५० रुपये
गावरान ४० रुपये
लॉकडाऊनमुळे ग्राहक कमी
आंब्याचा हंगाम हा मार्चपासून सुरू होऊन मे महिन्यापर्यंत असतो. या काळात कोकण, कर्नाटकातील आंबा उपलब्ध होतो. तसेच गावरान आंबेही येत असतात. अक्षय तृतीयेपर्यंत आंब्याला मागणी अधिक असते. शहरी ग्राहक तर जादा पैसे मोजूनही आंबा खाण्याचा आनंद घेतो; पण यंदा लॉकडाऊनमुळे आंबा खाण्यावर मर्यादा आल्या आहेत. बाजारात आंबा आहे; पण खरेदी आणि निवड ग्राहकांच्या हातात नाही. काही व्यापारी घरी जाऊन आंबे विकतात; पण ग्राहकांना पसंतीसाठी मोठ्या प्रमाणात उपलब्ध नाहीत, अशी स्थिती आहे.
.....................................
कोरोना लॉकडाऊनमुळे आंबा विक्री दरवर्षीपेक्षा ५० टक्के कमी झाली आहे. कारण, नागरिक बाहेर खरेदीसाठी येतच नाहीत. घरपोहोच आंबा केला जातोय; पण त्यालाही मोठा ग्राहक नाही. उष्णता वाढली की आंबा खराब होतो. यासाठी योग्य किंमत आली की विक्री केली जाते.
- बाबूलाल बागवान, आंबा विक्रेता
........
आंब्याची आवक चांगली होत आहे; पण कोरोनामुळे मागणी कमी झाली आहे. त्यामुळे ग्राहक शोधण्याची वेळ आली आहे. सध्या आंब्याचे दर ग्राहकांच्या आवाक्यातही आहेत. अक्षय तृतीयेनंतर आंब्याचा दर आणखी कमी होईल.
- सागर पवार, आंबा विक्रेता
..........
शेतीत केशर आंबा रोपे आहेत. यावर्षी आंब्याला मालही चांगला लागला आहे. आता आंबे विक्रीसाठी ठेवले आहेत; पण गिऱ्हाईकच मिळेना झाले आहे. लॉकडाऊनमुळे बाजारपेठही बंद आहे.
- रामराव पाटील, शेतकरी
...............
कोरोनामुळे आठवडी बाजार बंद आहेत. शहरातही जाता येत नाही. त्यामुळे आंबा विक्री कशी करायची, असा प्रश्न आहे. कारण, यावर्षी उत्पादन चांगले असूनही आंब्याला उठाव नाही, अशी स्थिती आहे.
- सोपान काळे, शेतकरी
.......................................................................................