यंदा भरपूर पाऊस; कोरोनानंतर जिल्ह्यात आता पुराची धास्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:26 AM2021-06-11T04:26:54+5:302021-06-11T04:26:54+5:30
प्रशासन सज्ज; जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घेऊन विविध विभागांना दिले आदेश लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : यंदाही मोठ्या प्रमाणावर पाऊस पडणार ...
प्रशासन सज्ज; जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घेऊन विविध विभागांना दिले आदेश
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : यंदाही मोठ्या प्रमाणावर पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिला असल्याने आता कोरोनानंतर जिल्ह्यात पुराची मोठी धास्ती आहे. आगामी संकट लक्षात घेऊन प्रशासन सज्ज झाले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी आपत्ती व्यवस्थापन समितीची नुकतीच बैठक घेऊन सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना केली आहे.
जिल्ह्यामध्ये कऱ्हाड, पाटण, वाई, फलटण आणि कोरेगावचा काही भाग या परिसरामध्ये कायमच पावसाळ्यात पूरस्थितीला जनता सामोरी जाते, तर पश्चिम भागामध्ये सातारा तालुक्याचा डोंगराळ भाग, जावळी पाटणचा डोंगरी परिसर यामध्ये मोठ्या प्रमाणावर दरडी कोसळत असतात. वीज प्रवाहदेखील अनेकदा खंडित होत असतो. या पार्श्वभूमीवर पाटबंधारे विभाग, बांधकाम विभाग, वीज विभाग यांना जिल्हा प्रशासनाच्या वतीने योग्य त्या सूचना करण्यात आल्या आहेत. जिल्हा प्रशासनाच्या मदतीसाठी एनडीआरएफची टीम २० जुलैपासून साताऱ्यात येणार आहे.
जिल्ह्यातील प्रमुख नद्या : ७
नदीशेजारील गावे : १७२
पूरबाधित होणारे तालुके : ५
प्रशासनाची काय तयारी?
- फायर फायटर : ८
- रेस्क्यू व्हॅन : नाही
- रबर बोटी : ८
- लाईफ जॅकेट : २००
- कटर : २७
जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान
९१८ मिलिमीटर
पूरबाधित क्षेत्र : ४५ गावे
कोट..
संभावित पूर परिस्थिती लक्षात घेऊन मागील आठवड्यातच विविध विभागांची बैठक बोलाविण्यात आली होती. अतिवृष्टी होऊन पूर परिस्थिती उद्भवल्यास प्रशासन सज्ज ठेवण्यात आले आहे. एनडीआरएफ सिस्टीम देखील बोलाविण्यात आली आहे.
- शेखर सिंह, जिल्हाधिकारी
अग्निशमन दल सज्ज
जिल्ह्यातील सर्व पालिकांचे अग्निशमन दल पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर सज्ज ठेवण्यात आले आहे. वाई, कऱ्हाड, पाटण यांना बोटी देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील सर्व नगरपालिकांना प्रशासनाच्या वतीने फ्लोटिंग पंप देण्यात आले आहेत.
टेबल स्ट्रक्चर्स हे पाण्यावर तरंगू शकते. असे २३ प्रशासनाच्या वतीने पालिका तसेच विविध यंत्रणांना देण्यात आले आहेत.
जिल्ह्यातील अशासकीय संस्था जशा महाबळेश्वर ट्रेकर, सह्याद्री ट्रेकर्स, छत्रपती शिवेंद्रसिंहराजे रेस्क्यू टीम, खंडाळा रेस्क्यू टीम यांच्याकडे देखील यंत्रसामग्री पोहोचविण्यात आली आहे. नायलॉन रोप, कटिंग मशीन, लाइफ जॅकेट्स, लाइफ बॉईज यांचे वितरण देखील करण्यात आले आहे.