प्रेमाची भाषा.. रस्ता, भिंत अन् झाडावरही!
By admin | Published: July 2, 2015 09:45 PM2015-07-02T21:45:16+5:302015-07-02T21:45:16+5:30
प्रेमिकांचे अफलातून प्रकार : ऐतिहासिक स्थळांचे पावित्र्य राखण्याचे आव्हान
कोंडवे : प्रेमीकांना प्रेम व्यक्त करण्यासाठी कोणतेही माध्यम चालते. पण हे माध्यम जर सार्वजनिक ठिकाणच्या सौंदर्याचे हरण करणारे असेल तर त्यावर तातडीने कार्यवाही होणे आवश्यक आहे. सार्वजनिक ठिकाणी उघडपणे आपल्या प्रेमाचे आणि प्रेमींचे नाव कोरले जावू लागले तर त्यावर आळा आणण्यासाठी काही ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे. ऐतिहासिक सातारा शहरात तरूणाईला मनसोक्त फिरण्यासारखी ठिकाणे आहेत. येथे आपल्या मित्र मैत्रीणींबरोबर वेळ घालविताना अनेकांना आता विकृती सुचू लागली आहे. पूर्वी कॉलेजच्या बाकांवर असणारी नावाची आद्याक्षरे आता चक्क ऐतिहासिक स्थळांवर आणि वास्तुंवर बघायला मिळू लागले आहेत. लाखो रूपये खर्च करून बांधण्यात आलेल्या संरक्षक भिंतीलाही या विकृतांनी सोडले नाही. कोणतेही कर्तृत्व नसताना केवळ भिंतीवर नाव यावे म्हणून पेंट क ॅन च्या सहाय्याने टप्प्या टप्प्यावर नाव आणि आद्याक्षरे लिहिण्यात आले असल्याचे अनेकांनी पाहिले आहे. सार्वजनिक मालमत्तेवर केलेली ही जाहिरात अनेकांनी पाहिली पण त्यावर आक्षेप कोणीच नोंदविला नाही. वास्तविक ज्या ज्या वेळी असे कोणी करत असेल तर त्यांना अटकाव करण्याचा प्रयत्न नागरिकांनी केला पाहिजे. सार्वजनिक मालमत्ता जतन करण्याची ही भावना सर्वांमध्ये निर्माण झाली पाहिजे. मानसोपचारतज्ज्ञांच्या मते व्यक्त होणे ही मनुष्याची प्रवृत्ती आहे. जेव्हा त्यांना व्यक्त व्हायला मर्यादा येतात. तेव्हा ते अन्य काही माध्यमांचा शोध घेतात. हा माध्यमांचा शोध घेताना त्यांना कशाचेच भान राहत नाही. म्हणूनच ऐतिहासिक वास्तु, भिंती आणि वृक्षांचे बुंदे हे त्यांच्या अभिव्यक्तीचे माध्यम होते. (वार्ताहर) सातारा जिल्ह्याचे राजकारण तसे संवेदनशील आहे. काहीही झाले तरी परस्परांच्या हद्दीत हस्तक्षेप झालेला येथे कोणालाच आवडत नाही. आखून दिलेल्या मतदार संघात प्रत्येकजण अधिराज्य गाजवत असतो. समजा त्यात कोणी मध्ये घुसखोरी केली तर जे काही घमासान सुरू होते, ते केवळ अवर्णनीय असेच असते. पण ऐतिहासिक चार भिंतीवर म्हसवे आणि जावली हे शब्द लिहून त्याखाली हृदय काढण्यात येत आहे. अनेकांना कदाचित ही राजकीय चाल वाटली असेल. पण येथे कायम येणाऱ्या आणि भिंतीवर अशा रेघोट्या मारणाऱ्या एका युवकाने याचे विश्लेषण उत्तम प्रकारे केले आहे. म्हसवे गावातील मुलगी आणि जावली गावातील मुलगा यांचे प्रेमसंबंध असावेत, त्यामुळे प्रेमींची नावे लिहिण्यापेक्षा त्यांनी गावांची नावे लिहून या दोघांचे प्रेमाचे नाते अधोरेखित केले आहे. झाडाच्या बुंद्यालाही टोचण शहर व परिसरात प्रेमीकांना बसण्यासाठी काही रिक्त परिसर आहे. शहरापासून आणि महाविद्यालयापासून जवळ असणाऱ्या अजिंक्यतारा परिसरात प्रेमी युगूल मोठ्या प्रमाणावर फिरायला जातात. रखरखत्या उन्हात उघड्यावर फिरायला जाताना त्यांना झाडाची सावली महत्वाची वाटते. झाडाच्या सावलीत बसून आपले प्रेम फुलविणाऱ्या या प्रेमीकांनी या झाडाच्या बुंद्यालाच टोचणी दिली आहे. अजिंक्यताऱ्याबरोबरच जिल्हा परिषद मैदानावरही संध्याकाळी युगुलांची बैठक असते. त्यावेळीही परस्परांवरील प्रेम प्रदर्शित करण्यासाठी आपल्या नावांचे आद्याक्षर झाडावर कोरल्याचे पहायला मिळत आहे. अजिंक्यताऱ्याच्या पायथ्याशी असणाऱ्या मंगळाई देवीच्या मंदिराला झाडांचा असा वेढा आहे. उन्हाळा पावसाळा येणाऱ्या प्रत्येकाला सावली देणाऱ्या या वृक्षाच्या बुंद्याला असे टोचण्यात आले आहे. आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी या युगुलांनी कोणतीच जागा शिल्लक ठेवली नाही. चक्क पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपवरही त्यांनी भावना व्यक्त केल्या आहेत.