‘व्हॅलेंटाईन डे’ला प्रियकराचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2018 11:48 PM2018-02-14T23:48:14+5:302018-02-14T23:48:19+5:30
पाटण/कोयनानगर : ‘व्हॅलेंटाईन डे’ला प्रेम प्रकरणातून युवकाचा गळा आवळून खून करण्यात आला. पाटण तालुक्यातील येराड-खंडूंचीवाडी येथे बुधवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. अक्षय निनू जाधव (वय २१, रा. बिबी, ता. पाटण) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेतले आहे.
कृष्णात देसाई व शिवाजी देसाई (दोघे रा. बिबी, ता. पाटण) अशी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिबी येथील अक्षय जाधव हा युवक मुबंई येथे नोकरीनिमित्त वास्तव्यास होता. त्याचे काही वर्षांपासून नजीकच्याच एका गावातील मुलीशी प्रेमसंबंध होते. या प्रेमसंबंधाला मुलीच्या कुटुंबीयांचा विरोध होता. वेळोवेळी त्यांनी त्यासंदर्भात अक्षयला दमदाटी केली होती. तसेच सहा महिन्यांपूर्वी मारहाणही करण्यात आली होती. मात्र, तरीही अक्षयचे संबंधित मुलीशी प्रेमसंबंध कायम होते. रविवार, दि. ११ फेब्रुवारी रोजी अक्षय मुबंईहून गावाकडे बिबी येथे आला होता. मंगळवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास तो गावातीलच अविनाश जाधव या मित्राची दुचाकी घेऊन घरातून बाहेर पडला. जाताना त्याने कुटुंबीयांना काहीही सांगितले नाही. तो आसपासच कोठेतरी गेला असावा, असे समजून कुटुंबीयांनीही त्याकडे दुर्लक्ष केले. मात्र, रात्री उशिरापर्यंत तो घरी परत आला नाही. त्यामुळे नातेवाइकांनी त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, संपर्क झाला नाही.
दरम्यान, बुधवार दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास काही गुराखी जनावरे चरत येराड गावच्या हद्दीत ‘खंडूचावाडा’ नावच्या शिवारात गेले. त्यावेळी झाडाखाली युवकाचा मृतदेह त्यांना आढळून आला. गुराख्यांनी याबाबतची माहिती दिल्यानंतर परिसरातील ग्रामस्थ त्याठिकाणी धावले. त्यावेळी मृत युवक अक्षय असल्याचे दिसून आले. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक नीता पाडवी, पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी त्याठिकाणी दाखल झाले. त्यांनी मृतदेहाची पाहणी केली असता गळा आवळून अक्षयचा खून झाल्याचे समोर आले. चौकशीत त्याच्या प्रेम प्रकरणाविषयीची माहितीही पोलिसांना मिळाली. त्यामुळे पोलिसांनी तत्काळ या प्रकरणात संबंधित मुलीच्या दोन नातेवाइकांना ताब्यात घेतले.
याबाबतची फिर्याद गणपत ज्ञानदेव जाधव यांनी पाटण पोलिसांत दिली आहे. पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे तपास करीत आहेत.
पोलीस ठाण्यात तणाव
प्रेम प्रकरणातील संबंधित मुलगी व तिच्या आईला पोलीस ताब्यात घेत नाहीत तोपर्यंत अक्षयचा मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा मृत अक्षयचे नातेवाईक व ग्रामस्थांनी घेतला. त्यामुळे बुधवारी सायंकाळी पाटण पोलीस ठाण्याच्या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. रात्री उशिरापर्यंत पोलिसांची यासंदर्भात नातेवाईक व ग्रामस्थांशी चर्चा सुरू होती.