कोयनेतून विसर्ग कमी, धरणसाठा ७२ टीएमसीवर, पावसाची उघडझाप
By नितीन काळेल | Published: July 31, 2023 12:45 PM2023-07-31T12:45:50+5:302023-07-31T12:46:05+5:30
नवजाला १०५ मिलीमीटरची नोंद
नितीन काळेल, लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागासह कोयना धरणक्षेत्रातही पावसाचे प्रमाण कमी झालेले आहे. त्यामुळे कोयनेत येणाऱ्या पाण्याचीही आवक कमी झाल्याने धरणातील विसर्ग कमी करण्यात आला आहे. सध्या वीजगृहातून १०५० क्यूसेक विसर्ग सुरू आहे. तर धरणात ७२ टीएमसीवर पाणीसाठा झाला आहे. त्याचबरोबर २४ तासांत सर्वाधिक पाऊस नवजाला १०५ मिलीमीटर झाला.
पश्चिम भागातील कास, बामणोली, तापोळा, नवजा, कोयना, महाबळेश्वरसह परिसरात मागील १५ दिवस चांगला पाऊस पडला. त्यामुळे कोयनेसह धोम, बलकवडी, कण्हेर, तारळी, उरमोडी या प्रमुख धरणांत चांगलाच पाणीसाठा वाढला. तर इतर छोटी धरणे भरली. पण, शनिवारपासून पावसाचा जोर कमी होत गेला. तर रविवारपासून पावसाची उघडझाप सुरू आहे. त्यामुळे धरणात कमी प्रमाणात पाण्याची आवक होत आहे. परिणामी धरणसाठ्यातही सावकाशपणे वाढ होत आहे. तर कोयना धरणक्षेत्रातही पावसाचा जोर कमी झालेला आहे. त्यामुळे आवक कमी झाल्याने धरण व्यवस्थापनाने पायथा वीजगृहाचे एक युनिट रविवारी सायंकाळी बंद केले. परिणामी १०५० क्यूसेक विसर्ग बंद करण्यात आला. तर सध्या एकाच युनीटमधून १०५० क्यूसेक विसर्ग सुरू आहे.
सोमवारी सकाळच्या सुमारास कोयना धरणात १८ हजार ५०० क्यूसेक वेगाने पाणी येत आहे. तर धरणसाठा ७२.२२ टीएमसी झाला आहे. सकाळी ८ पर्यंतच्या २४ तासांत सर्वाधिक पाऊस नवजा येथे १०५ झाला. तर कोयनेला ६४ आणि महाबळेश्वर येथे ८२ मिलीमीटर पर्जन्यमान झाले आहे. एक जूनपासूनचा विचार करता नवजा येथे ३८३८, महाबळेश्वरला ३६३३ आणि कोयनानगर येथे २७३० मिलीमीटर पाऊस पडलेला आहे.