Satara: कोयना पाणलोट क्षेत्रात पाऊस कमी; वीजगृहातील विसर्गही बंद
By नितीन काळेल | Published: August 8, 2024 06:37 PM2024-08-08T18:37:37+5:302024-08-08T18:38:14+5:30
धरण भरण्यासाठी वेळ लागणार; नवजाला ५६ मिलिमीटरची नोंद
सातारा : जिल्ह्यात पावसाची उघडझाप सुरू असून कोयना धरणात पाण्याची आवक कमी झाली आहे. त्यामुळे धरणाच्या पायथा वीजगृहातील विसर्गही बंद करण्यात आला आहे. तर गुरूवारी सकाळच्या सुमारास धरणात ८७ टीएमसीवर साठा झाला होता. धरण भरण्यासाठी अजून १८ टीएमसी पाण्याची गरज आहे. तर २४ तासांत नवजाला ५६ मिलिमीटरची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात जुलै महिन्यात सर्वत्रच धुवाधार पाऊस पडला. यामुळे पश्चिम भागात जनजीवन विस्कळीत झाले होते. पाणी प्रकल्पातही मोठ्या प्रमाणात पाणीसाठा वाढला. पण, आॅगस्ट महिना उजाडल्यानंतर पावसाचे प्रमाण कमी होत गेले आहे. सध्या पश्चिम भागातच पावसाची उघडझाप सुरू आहे. तर पूर्व माण, खटाव, फलटण, कोरेगाव तालुक्यात उघडीप आहे. यामुळे खरीप हंगामातील पिकांना फायदा होणार आहे. तरीही पश्चिम भागात अजून पावसाची आवश्यकता आहे. तरच धरणे भरणार आहेत.
गुरूवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत काेयनानगर येथे ३० मिलिमीटर पर्जन्यमान झाले. तर नवजा येथे ५६ आणि महाबळेश्वरला ४८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. एक जूनपासूनचा विचार करता सर्वाधिक पर्जन्यमान नवजा येथे ४ हजार ९६६ मिलिमीटर झाले आहे. यानंतर महाबळेश्वरला ४ हजार ६९८ आणि कोयनानगर येथे ४ हजार २२० मिलिमीटर पाऊस झाला. पाऊस कमी झाल्याने धरणातही पाण्याची आवक कमी होत आहे.
गुरूवारी सकाळच्या सुमारास कोयना धरणात ८ हजार १३५ क्यूसेक वेगाने पाणी येत होते. तर धरणातील पाणीसाठा ८७.३० टीएमसी झालेला. धरणातील पाणीसाठा ८२.९५ टक्के झाला आहे. तर धरण भरण्यासाठी अजून सुमारे १८ टीएमसी पाण्याची गरज आहे. त्यातच धरणात पाण्याची आवक कमी असल्याने गुरूवारी सकाळपासून पायथा वीजगृहातील २ हजार १०० क्यूसेक विसर्गही थांबविण्यात आलेला आहे. त्यामुळे सध्या धरणातून पूर्णपणे विसर्ग बंद झालेला आहे.