पावसाचा जोर ओसरला, कोयनेचे दरवाजे बंद!, धरणात ९६ टीएमसी पाणीसाठा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2022 02:05 PM2022-08-23T14:05:24+5:302022-08-23T14:08:09+5:30

पावसाचा जोर ओसरल्याने दहा दिवसांनी धरणाचे दरवाजे बंद करण्यात आले आहेत.

Low rainfall in Satara district, gates of Koyna dam closed | पावसाचा जोर ओसरला, कोयनेचे दरवाजे बंद!, धरणात ९६ टीएमसी पाणीसाठा

संग्रहित फोटो

Next

प्रमोद सुकरे

कराड : कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर ओसरल्याने काल, सोमवारी सायंकाळी धरणाचे सहा वक्र दरवाजे बंद करण्यात आले आहेत. सध्या पायथा वीज गृहातून २१०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरणात प्रतिसेकंद १३,८१४ क्युसेक पाण्याची आवक होत आहे. पावसाचा जोर आणि आवक कमी झाल्याने नद्यांची पाणी पातळी कमी होऊ लागली आहे.

कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढून पाण्याची मोठ्या प्रमाणात आवक सुरू झाल्यानंतर धरण व्यवस्थापनाने दि. ११ ऑगस्ट रोजी पायथा वीजगृह कार्यान्वित करून २१०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू केला होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी (दि. १२ ऑगस्ट) धरणाचे सहा वक्र दरवाजे दीड फुटाने उघडून ८००० क्युसेक पाणी नदीपात्रात सोडले होते. १५ ऑगस्ट नंतर दरवाजे साडे चार फुटांनी उघडण्यात आले होते. पायथा वीजगृह आणि दरवाजांतून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू झाल्याने धरणाची पाणी पातळी नियंत्रित करता आली. पावसाचा जोर ओसरल्याने दहा दिवसांनी धरणाचे दरवाजे बंद करण्यात आले आहेत.

कोयना धरणात सध्या ९६.११ टीएमसी पाणीसाठा असून धरण ९१ टक्के भरले आहे. पाणलोट क्षेत्रात रिमझिम पाऊस सुरू आहे. धरणात १३,८१४ क्युसेक पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे पायथा वीजगृहातून विसर्ग सुरू ठेवला आहे. सोमवारी दिवसभरात कोयनानगर आणि नवजा येथे प्रत्येकी २१ मिलीमीटर, तर महाबळेश्वर येथे ५१ मिलीमीटर पाऊस झाला आहे.

Web Title: Low rainfall in Satara district, gates of Koyna dam closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.