पश्चिमेला पावसाचा जोर कमी; कोयनेचे दरवाजे दोन फुटांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:49 AM2021-09-16T04:49:38+5:302021-09-16T04:49:38+5:30
सातारा : जिल्ह्याच्या पश्चिमेकडे पावसाचा जोर कमी झाला आहे. बुधवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत महाबळेश्वरला सर्वाधिक ५३ मिलिमीटरची नोंद झाली. ...
सातारा : जिल्ह्याच्या पश्चिमेकडे पावसाचा जोर कमी झाला आहे. बुधवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत महाबळेश्वरला सर्वाधिक ५३ मिलिमीटरची नोंद झाली. तर धरणात येणाऱ्या पाण्याची आवक कमी झाल्याने कोयेनेचे दरवाजे सवा पाचवरून दोन फुटांपर्यंत खाली घेण्यात आले. त्यामुळे धरणातून एकूण २०२०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता.
जिल्ह्याच्या मागील १५ दिवसांपासून पाऊस सुरू झाला आहे. त्यापूर्वी एक महिना पावसाची दडी होती. अपवाद वगळता पश्चिम भागात तुरळक प्रमाणात पाऊस झाला. तर पूर्वेकडे पावसाची उघडीप होती. आता मागील काही दिवसांपासून पाऊस होत असल्याने खरीप हंगामातील पिकांना फायदा झाला आहे. तसेच पश्चिम भागातील प्रमुख धरणांत वेगाने साठा वाढला. यामुळे वर्षभराची चिंता मिटलेली आहे. असे असलेतरी मंगळवारपासून पाऊस कमी झाला आहे.
बुधवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे ३४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर जूनपासून ४१८८ मिलिमीटर पाऊस पडला आहे. नवजाला ३२ आणि यावर्षी आतापर्यंत ५४९२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्याचबरोबर महाबळेश्वरला सकाळपर्यंत ५३ आणि जूनपासून ५५५८ मिलिमीटर पाऊस पडला आहे.
सकाळच्या सुमारास कोयना धरणात ४८६२० क्युसेक वेगाने पाण्याची आवक होत होती. तर पायथा वीजगृहातून २१०० आणि सहा दरवाजातून ४६५२० असा एकूण ४८६२० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता. पण, पावसाचा जोर कमी झाल्याने धरणात पाणी आवक कमी होत होती. त्यामुळे दुपारी एकच्या सुमारास धरणाचे सर्व सहा दरवाजे दोन फुटांपर्यंत खाली घेण्यात आले. या दरवाजातून १८१०० आणि पायथा वीजगृहातून २१०० असा २०२०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता. धरणातून सोडण्यात येणारे पाणी कोयना नदीत जात आहे.
चौकट :
धोम, कण्हेरमधून विसर्ग सुरू
पश्चिम भागात पाऊस सुरू आहे. त्यामुळे धरणात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झालेला आहे. सकाळच्या सुमारास धोम धरणात ९८.८० टक्के पाणीसाठा झाला होता. कण्हेरमध्ये ९९.३९, कोयना ९८.६७, उरमोडी ९१.१२, बलकवडी ९९.३९ आणि तारळी धरणात ९४.२८ टक्के पाणीसाठा होता. त्याचबरोबर धोममधून ३७५, कण्हेर १४६३, बलकवडी ११६३ आणि तारळी धरणातून ६८४ क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत होता.
..........................................................