टोमॅटोच्या निच्चांकी दराने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:26 AM2021-06-24T04:26:17+5:302021-06-24T04:26:17+5:30
कोपर्डे हवेली : प्रत्येक वर्षी टोमॅटोच्या उत्पादन खर्चात वाढ होत आहे तर तुलनेत टोमॅटोला बाजारपेठेत निच्चांकी दर मिळत असल्याने ...
कोपर्डे हवेली : प्रत्येक वर्षी टोमॅटोच्या उत्पादन खर्चात वाढ होत आहे तर तुलनेत टोमॅटोला बाजारपेठेत निच्चांकी दर मिळत असल्याने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च निघणे अवघड झाले आहे. टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांची शेती तोट्यात गेली असून, शेतकऱ्यांचे अर्थिक कंबरडे मोडले आहे.
कऱ्हाड तालुक्यातील अनेक शेतकरी टोमॅटोचे उत्पादन घेतात. इतर हंगामाच्या तुलनेत उन्हाळी हंगामात टोमॅटोचे उत्पादन क्षेत्र जादा असते. त्याच्या तोड्याची सुरुवात जून महिन्यात होते. अनेक शेतकऱ्यांनी उत्पादन खर्च जादा करून टोमॅटोच्या बागा चांगल्या आणल्या आहेत. सध्या टोमॅटोचे तोडे सुरू होऊन मुंबई बाजारपेठेत टोमॅटो पाठवला जात आहे. दहा किलोचा दर ८० रुपयांपासून ९० रुपये मिळत आहे. तोडणी, वाहतूक आणि उत्पादन खर्च याचा विचार करता हा दर कमी आहे. त्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांची शेती तोट्यात गेली असून, शेतकऱ्यांचे अर्थिक कंबरडे मोडले आहे. अनेक शेतकऱ्यांचा टोमॅटो तोडणीअभावी शेतातच पडून आहे. तर अनेकांनी दर परवडत नसल्याने तोडेच बंद केले आहेत. दर वाढेल या आशेवर अनेक शेतकरी आहेत. एकरी उत्पादन खर्च हा लाखाच्यावर येत असून, झालेला खर्च कसा निघणार, याविषयी शेतकरी चिंतेत आहेत. त्यातच आठ दिवसांपूर्वी पडलेल्या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांच्या टोमॅटो बागांचे नुकसान झाले आहे.
चौकट...
टोमॅटोचे गेल्या दोन वर्षांचे दर
मुंबई बाजारपेठेतील दर २०१९ टोमॅटोला दहा किलोला जानेवारीमध्ये १०० ते १३० रुपये, १५ एप्रिल ते २० जून ३५० ते ४०० रुपये, जुलै ते डिसेंबर १०० ते १६० रुपये. २०२० जानेवारी ते मार्च ५० ते ६० रुपये, जून ते जुलै १५० ते २०० रुपये, ऑगस्ट ५० ते ६० रुपये, २०२१ मार्च ते मे ५० ते ७० रुपये, जून ८० ते ९० रुपये.
(कोट)
गत दोन वर्षांपासून टोमॅटोच्या उत्पादन खर्चात मोठी वाढ झाली असून, त्या तुलनेत दर मिळत नाही. यावर्षी मी दीड एकर क्षेत्रावर टोमॅटोचे पीक घेतले आहे. त्यासाठी दोन लाख रुपये उत्पादन खर्च केला आहे तर दहा किलोला सत्तर ते ऐंशी रुपये दर मिळत आहे.
- भाऊसाहेब चव्हाण, शेतकरी, कोपर्डे हवेली.