सातारा अन् महाबळेश्वरात नीच्चांकी तापमान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2020 03:18 PM2020-12-21T15:18:28+5:302020-12-21T15:24:57+5:30
सातारा जिल्ह्यातील किमान तापमानात सतत उतार होत असून सोमवारी सातारा येथे १२.०१ आणि महाबळेश्वरला ११.०५ अंशाची नोंद झाली. यावर्षातील दोन्ही शहरातील हे सर्वात नीच्चांकी तापमान ठरले. त्यातच शीत लहर असल्याने गारठ्यात वाढ झाली आहे.
सातारा : जिल्ह्यातील किमान तापमानात सतत उतार होत असून सोमवारी सातारा येथे १२.०१ आणि महाबळेश्वरला ११.०५ अंशाची नोंद झाली. यावर्षातील दोन्ही शहरातील हे सर्वात नीच्चांकी तापमान ठरले. त्यातच शीत लहर असल्याने गारठ्यात वाढ झाली आहे.
जिल्ह्यात मागील महिन्यापासून थंडीला सुरूवात झाली. मात्र, यावर्षी किमान तापमानात सतत चढ-उतार होत आला आहे. कधी किमान तापमान १५ अंशाच्या खाली येते. तर काहीवेळा २० अंशावरही पोहोचते. त्यातच ढगाळ वातावरणाचाही अनुभव घ्यावा लागतो. त्यामुळे सातारकरांना विविध हवामानाशी सामना करावा लागत आहे.
मागील आठवड्यात साताऱ्याचे किमान तापमान २० अंशापर्यंत पोहोचले होते. त्यानंतर हळू-हळू तापमानात उतार आला. आता तर साताऱ्यातील किमान तापमान १२ अंशापर्यंत खाली आलेले आहे.
२० डिसेंबर रोजी साताऱ्यात १४.०८ अंश तापमानाची नोंद झालेली. तर सोमवारी १२.०१ अंश तापमान नोंदले गेले. यावर्षातील साताऱ्यातील हे नीच्चांकी तापमान ठरले. तर मागील महिन्यात ११ नोव्हेंबरला साताऱ्यांत १२.०६ अंश तापमानाची नोंद झाली होती. त्यानंतर प्रथमच तापमान यापेक्षाही खाली आले आहे.
महाबळेश्वरमध्येही थंडीचा जोर वाढला आहे. मागील काही दिवसांपासून गुलाबी थंडीचा आनंद पर्यटक लुटत आहेत. महाबळेश्वरमध्ये रविवारी १२.०१ अंश तापमान होते. तर सोमवारी ११.०५ अंशाची नोंद झाली. त्यामुळे सलग दुसºया दिवशी महाबळेश्वरमधील किमान तापमान नीच्चांकी राहिले.
दरम्यान, किमान तापमान वाढत चालल्याने थंडीने जोर धरला आहे. यामुळे मॉर्निंग वॉक करणाऱ्यांवरही परिणाम झाला आहे. दुपारपर्यंत वातावरणात थंडी राहते. तर सायंकाळपासून पुन्हा थंडीला सुरूवात होत आहे. त्यामुळे नागरिकांना ऊबदार कपड्याशिवाय बाहेर पडता येत नाही.