लखनऊची सानिया चुकली उंब्रजच्या बाजारात!.. तीन तासानंतर आईच्या कुशीत :
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 01:23 AM2017-12-13T01:23:51+5:302017-12-13T01:25:47+5:30
उंब्रज : लखनऊ येथून रोजगाराला येथे आलेल्या खानसाहेब कुटुंबातील चिमुकली येथील बाजारपेठेत चुकली. एका सतर्क महिलेने, पत्रकार व पोलिसांच्या मदतीने
उंब्रज : लखनऊ येथून रोजगाराला येथे आलेल्या खानसाहेब कुटुंबातील चिमुकली येथील बाजारपेठेत चुकली. एका सतर्क महिलेने, पत्रकार व पोलिसांच्या मदतीने त्या चिमुकल्या सानियाला तीन तासांच्या शोधमोहिमेनंतर परत आईच्या कुशीत पोहोचविले.
उंब्रजचा सोमवार हा आठवडी बाजाराचा दिवस. या बाजारात तीन वर्षांची एक चिमुकली ‘अम्मा अम्मा’करून रडत होती. बराच वेळ ती रडत असल्यामुळे ती चुकली असल्याचा संशय येथील गृहिणी अनिता रणजित पवार यांना आला. त्यांनी तिला जवळ घेतले. खाऊ दिला. तिची विचारपूस करण्यास सुरुवात केली. मात्र, तिला मराठी येत नव्हते. त्यामुळे ती काय बोलत होती, हे कोणाला समजले नाही.
अनिता पवार यांनी बाजारपेठेत इतरत्रही विचारपूस केली. मात्र, कोणाकडेच या मुलीबद्दल माहिती समजू शकली नाही. यानंतर अनिता यांनी आपले पत्रकार असलेले दीर अभिजित पवार यांना फोनवरून संपर्क साधला.तातडीने पत्रकार पवार, पत्रकार प्रवीण कांबळे बाजारपेठेत गेले. त्यांनीही चिमुकलीच्या कुटुंबाची शोधाशोध केली. मात्र गर्दीत थांगपत्ता लागला नाही. यानंतर त्या चिमुकलीला त्यांनी उंब्रज पोलिस ठाण्यात नेले. यानंतर पोलिस निरीक्षक जोतिराम गुंजवटे व त्यांच्या टीमने तातडीने तपास सुरू केला.
बाजारपेठेत हरविलेल्या चिमुकलीची आई तिला परत भेटल्यामुळे सर्वांनाच हायसे वाटले. मुलीची आई खातून किस्मतुल खानसाहेब यांनी सांगितले की, आम्ही लखनऊचे आहोत. कामानिमित्ताने उंब्रज येथील काशीद गल्ली येथे गेल्या तीन महिन्यांपासून भाड्याने खोली घेऊन राहतो. सकाळी अकराच्या सुमारास बाजारपेठेतील मेडिकलमध्ये औषधे घेण्यासाठी आले होते. तेव्हा सानिया व आणखी एक लहान मुलगी बरोबर होती. मात्र, औषधे घेत असताना सानिया कुठे गेली, हे समजलेच नाही. तिचा सर्वत्र शोध घेतला.
दुकानदारांकडे विचारणा केली. मात्र, सानिया सापडली नव्हती. तिच्या जीवाचे वाईट काय झाले का? अशी भीती वाटत होती. तेव्हाच पोलिस गाडीतून केले गेलेले अनाउन्समेंट ऐकून पळत गाडीजवळ आली. गृहिणी म्हणून काम करणाºया अनिता पवार, पत्रकार व उंब्रज पोलिस या सर्वांनी जी सतर्क ता दाखवून माणुसकी जपली. त्यामुळे तीन तासानंतर चिमुकल्या सानियाला तिची आई परत मिळाली, याचा आनंद झाला.
ध्वनिक्षेपकाचा वापर
त्या चिमुकलीला बरोबर घेऊन महिला पोलिस, दोन पोलिस कर्मचारी पोलिस गाडीसह बाजारपेठेत गेले. पोलिस गाडीवर असलेल्या स्पीकरचा वापर करण्यात आला. मुलगी हरवल्याचे अनाऊन्स करण्यात आले आणि अवघ्या दहा मिनिटांतच रडत मुलीची आई पोलिस गाडीजवळ आली. आपली मुलगी पोलिसांकडे सुखरूप असल्याचे पाहून तिला आनंद झाला.