सातारा जिल्ह्यात लम्पी वाढला; बाधित जनावरे हजार पार!, बळीराजा चिंतेत
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2022 02:27 PM2022-09-26T14:27:13+5:302022-09-26T14:27:52+5:30
सातारा जिल्ह्यात लम्पी त्वचा रोग झालेले पहिले जनावर २ सप्टेंबरला कऱ्हाड तालुक्यातील वाघेरी येथे आढळून आले होते.
सातारा : जिल्ह्यातील बळीराजासमोर लम्पी त्वचा रोगाचे संकट असून, ते सतत वाढतच चालले आहे. रविवारी तर बाधित नवीन ३८६ जनावरे स्पष्ट झाल्याने एकूण आकडा १०५६ वर पोहोचला. तर आणखी ९ जनावरांचा मृत्यू झाला. त्यामुळे आतापर्यंत लम्पीने ६२ जनावरांचा बळी गेला आहे. जिल्ह्यातील संकट वाढत असल्याने बळीराची चिंता आणखी वाढली आहे.
मागील दीड महिन्यापासून लम्पी त्वचा रोगाचा प्रसार देशात वाढला आहे. जनावरांना हा आजार होत असून काहीवेळा त्यांचा बळीही जात आहे. त्यामुळे शासनाने याबाबत दखल घेत विविध उपाययोजना आखण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्रातही जनावरांना लम्पी होण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. सातारा जिल्ह्यात तर लम्पीचा प्रसार अधिक वाढत चालला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १०५६ जनावरे बाधित झाली आहेत. तर ६२ जनावरांचा लम्पी रोगाने मृत्यू झाला आहे.
सातारा जिल्ह्यात लम्पी त्वचा रोग झालेले पहिले जनावर २ सप्टेंबरला कऱ्हाड तालुक्यातील वाघेरी येथे आढळून आले होते. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने याची दखल घेतली. तसेच राज्य आणि जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाने विविध पातळीवर माहिती घेणे, लसीकरण करणे, शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित केली. पण, २ सप्टेंबरला लम्पी त्वचा रोग झालेले जनावर आढळल्यानंतर आतापर्यंत १० तालुक्यांत लम्पी त्वचा रोगाचा प्रसार झाला आहे. जिल्ह्यातील १० तालुक्यांतील ८१ गावांतील जनावरांना लम्पी रोग झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पशुसंवर्धन विभागाने लसीकरण मोहिमेचा वेग वाढवला आहे.
बाधित जनावरांत अशी लक्षणे...
- गाय किंवा बैलांमध्ये लम्पी होण्याचे प्रमाण अधिक आहे.
- लम्पी त्वचा रोगात जनावरे तापाने फणफणतात.
- नाक आणि तोंडातून स्त्राव सुरू होतात.
- बाधित जनावरांचे वजन कमी होत जाते.
- चारा खाण्यावर परिणाम होतो.
- मृत्यू झालेल्या पशुधनाला खोलवर पुरले जाते.
दोन लाखांवर जनावरांना लस...
जिल्ह्यात आतापर्यंत गाय आणि बैल यांनाच लम्पी त्वचा रोगाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पशुसंवर्धन विभागाने गाय आणि बैलांच्या लसीकरणावर भर दिला आहे. जिल्ह्यातील या पशुधनाची संख्या ३ लाख ५२ हजार इतकी आहे. आतापर्यंत २ लाख १५ हजार ६५८ पशुधनाला लस देण्यात आली. तर जिल्ह्याला एकूण २ लाख ८१ हजार ८०० एवढी लसमात्रा उपलब्ध झाली आहे. सप्टेंबरअखेरपर्यंत गाय आणि बैलांचे संपूर्ण लसीकरण करण्यात येणार आहे.