झटपट श्रीमंती, हायटेक जगण्याच्या लालसेने तरुणाई वळू लागली गुन्हेगारीकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2021 02:09 PM2021-11-15T14:09:53+5:302021-11-15T14:10:38+5:30
हसणे, खेळणे मौज मस्ती करणे व शिक्षणाच्या वयातच अल्पवयीन मुलांच्या हाती चाकू सुरा पिस्तूल अशी शस्त्रे येऊ लागली आहेत. खून, खुनाचा प्रयत्न, चोरी, दरोडा व घरफोडी अशा गंभीर गुन्ह्यात हे तरुण अडकत आहेत.
दत्ता यादव
सातारा : हायटेक जगण्याच्या लालसेने तरुणाई गुन्हेगारीकडे वळत आहे. विशेष म्हणजे झटपट श्रीमंती कमी श्रमात अधिक पैसा व मौजमस्ती यामुळेच तरुण चोरीच्या गुण्याकडे वळल्याचे दिसून येत आहे. हसणे, खेळणे मौज मस्ती करणे व शिक्षणाच्या वयातच अल्पवयीन मुलांच्या हाती चाकू सुरा पिस्तूल अशी शस्त्रे येऊ लागली आहेत. खून, खुनाचा प्रयत्न, चोरी, दरोडा व घरफोडी अशा गंभीर गुन्ह्यात हे तरुण अडकत आहेत. सातारा जिल्हा मध्यवर्ती कारागृहात देखील सर्वाधिक बंदी हे २० ते ३५ या वयोगटातील आहेत.
चोरी, घरफोडी, लूटमार अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये त्यात तरुणांचा सहभाग आहे. एका गुन्ह्यात जामिनावर सुटल्यानंतर केल्यावर लगेच काही दिवसात तो दुसरा गुन्हा करतो. त्यामुळे तो परत कारागृहात पोहोचतो. तिथे गुन्हेगारी प्रवृत्तीचे तरुण असल्याने गुन्हेगारीतून बाहेर पडण्याऐवजी त्यांच्याकडून गुन्हेगारीचे धडे मिळू लागतात. असा यापूर्वीचा पोलिसांच्या तपासातील अनुभव आहे. काही अल्पवयीन मुलेही चोरी करीत आहेत. गरिबीमुळे त्यांची मोबाईल खरेदी करण्याची परिस्थिती नसते. त्यामुळे ही मुळे मोबाईल चोरीतून हौस आणि पैसाही मिळविण्याचा प्रयत्न करतात. अशी मुले अल्पयीन असल्याने कायद्याच्या चौकटीत सापडत नाहीत.
हे असे का घडतेय..
आत्ताची मुलं वेबसिरीज व चित्रपटांचे अनुकरण करायला लागले आहेत. चांगल्या पेक्षा वाईट गोष्टीत आहारी गेलेली आहेत. मुलांची संगत आवडीनिवडी यावर त्यांचे वागणं ठरू लागले आहे. गुन्हेगारीकडे वळणारा तरुण उद्याच्या भविष्याचा तसेच कुटुंबाचा विचार करत नाही. याच वयात त्यांना योग्य मार्गदर्शन समुपदेशनची गरज आहे.
चोरीच्या घटनात तरुण अधिक
मोबाईल दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये सर्वाधिक तरुण असल्याचे तपासात उघड झाले आहे. कमी श्रमात अधिक पैसा व मौजमस्ती हेच त्यामागील कारण असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे या मुलांनी वेगळ्या नावाने आपल्या टोळ्या तयार केल्या आहेत. त्या टोळ्या सध्या पोलीस अधीक्षक विजयकुमार बन्सल हे हद्दपार करत आहेत. मात्र तरीसुद्धा अद्याप अशा काही टोळ्या जिल्ह्यामध्ये कार्यरत आहेत. त्यांच्यावर पोलिसांचा वॉच असून त्यांनाही हद्दपार केले जाणार आहे.
पालकांनी काळजी घ्यावी
आपली मुले काय करताहेत याकडे खरेतर पालकांचे लक्ष नसल्याचे दिसून येत आहे. मुलाची एखादी चुकीची गोष्ट कानावर आली तर पालकांचे ऐकून घेण्याची मानसिकता मुलांमध्ये राहिलेली नाही. पालकांनी मुलांशी संवाद वाढवायला हवा. मैत्रीचे नाते निर्माण करायला हवे. त्याशिवाय त्यांचे मित्र-मैत्रिणी कोण. त्यांची पार्श्वभूमी काय, याची माहिती पालकांनी घ्यावी.
ज्यांच्या हाती उद्याचे भविष्य आहे. अशी तरुण पिढी गुन्हेगारीकडे वळल्याचे दिसून येत आहे. शाळा-महाविद्यालयांमध्ये पोलीस दलाच्या वतीने कार्यशाळा घेऊन वेळोवेळी जनजागृती करण्यात येते. यात पालकांची मोठी जबाबदारी आहे. आपला पाल्य काय करतो याकडे अधिक लक्ष देऊन पालकांनी त्यांच्याशी मैत्रीपूर्ण संवाद वाढला पाहिजे. - किशोर धुमाळ, पोलीस निरीक्षक , स्थानिक गुन्हे शाखा
गेल्या वर्षभरातील चोरीच्या घटना
जानेवारी ०८
फेब्रुवारी ११
मार्च ०२
एप्रिल ०४
मे ०६
जून ०८
जुलै ११
ऑगस्ट २३
सप्टेंबर ३२