एशियाड बसमध्ये आता ‘लक्झरी’ आसन व्यवस्था
By admin | Published: May 16, 2016 12:44 AM2016-05-16T00:44:55+5:302016-05-16T00:56:04+5:30
‘भंगार डब्बा’ कात टाकतोय : सातारा विभागाच्या ताफ्यात २७ गाड्या दाखल
जगदीश कोष्टी / सातारा
‘लाल डबा’, ‘भंगार डबडा’ ही ओळख पुसण्यासाठी एसटी महामंडळ नेहमीच प्रयत्नशील असते. खासगी प्रवासी वाहतुकीशी स्पर्धा करताना नवनवीन बदल स्वीकारत आहे. लक्झरी गाड्यांप्रमाणेच एसटीने एशियाडमधील आसन रचनेत बदल केला आहे. प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर व्हावा, यासाठी सीटची मागे घेण्याची सुविधा बसमध्ये करण्यात आली आहे. त्यामुळे एशियाड बस आता खऱ्या अर्थाने आरामदायी झाली आहे.
राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यात सध्या हिरकणी, परिवर्तन, साधी गाडी, मिनी बस तर काही भागांत मिडी बसही प्रवाशांची सेवा बजावत आहेत. मात्र, उचकटलेले पत्रे अन् गळक्या गाड्यांमुळे एसटीला हिणवले जात होते. महाराष्ट्रातील रस्त्यांची अवस्था पाहिल्यानंतर गाड्या आणल्या तरी त्यांचा खुळखुळा होतो. पत्रे उचकटणे, खिडक्या अन् काचा ढिल्या होणे हा प्रकार घडत असतो. त्यामुळे गाड्यांची अवस्था दिवसेंदिवस दयनीय होते आहे. सतत आवाज करत असल्याने लोकांना प्रवास करताना डोकेदुखी होत असते. त्यामुळे सुशिक्षित प्रवाशांमधून एसटीविषयी नाराजीचा सूर निघत होता.
त्यामुळे प्रवासी खासगी वाहतुकीचा आधार घेत असतात. प्रवाशांना एसटीकडे खेचण्यासाठी राज्य परिवहन महामंडळानेही एसटी बसच्या रचनेत व सेवेत वेळोवेळी बदल करण्याची भूमिका घेतली आहे.
एशियाड हिरकणी गाड्यांच्या आसनरचनेत बदल केला असून, प्रवास अधिक सुखकर होण्याच्या दृष्टीने गाडीतील आसने हवी त्याप्रमाणे पाठीमागे घेण्याची व्यवस्था केली आहे. त्यामुळे लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये आरामदायी प्रवास होत आहे. नवीन बनावटीच्या गाड्या तीन महिन्यांपासून रस्त्यावर धावू लागल्या आहेत. नवीन बनावटीच्या २७ गाड्या सातारा विभागाच्या ताफ्यात दाखल झाल्या आहेत.
आसन क्षमता दोनने कमी
सीट मागे घेतल्यानंतर पाठीमागील प्रवाशांना त्याचा त्रास होऊ नये यासाठी पुरेसे अंतर ठेवावे लागते. त्यामुळे एशियाड गाड्यांमधील आसन क्षमता कमी केली आहे. ही संख्या ३५ वरून ३३ वर आली आहे.
साध्या गाडीच्या तुलनेत एशियाडमध्ये तिकिटात १५ ते २० रुपयांची वाढ होते. त्यामुळे नव्या नियमानुसार प्रवाशांचा प्रवास खऱ्या अर्थाने सुखदायी होणे अपेक्षित आहे. गाड्यांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी घेतल्यास त्याचा बसलेलांना त्रास होऊ शकतो. त्यामुळे नवीन रचनेमध्ये भलेही आसन क्षमता दोनने कमी झाली असली तरी एकाही प्रवाशाला उभे राहून प्रवास करू देऊ नये, असा नियम तयार केला आहे.