माण, खटावच्या जनतेसाठी कोविड सेंटर सुरू करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:38 AM2021-04-21T04:38:11+5:302021-04-21T04:38:11+5:30
म्हसवड : माण, खटाव तालुक्यांत कोरोनाचे प्रमाण वाढल्याने अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. बाधित रुग्णांची अपुऱ्या बेडमुळे फरफट ...
म्हसवड : माण, खटाव तालुक्यांत कोरोनाचे प्रमाण वाढल्याने अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. बाधित रुग्णांची अपुऱ्या बेडमुळे फरफट होत आहे. कोरोनापुढे सर्वजण हतबल झाले आहेत. प्रशासनाने जागा द्यावी त्याठिकाणी आठवडाभरात कोविड सेंटर उभारले जाईल, अशी ग्वाही शेखर गोरे यांनी दिली.
ते म्हणाले, माण-खटाव तालुक्यात कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे बेडची संख्या कमी पडत आहे. बहुतांश रुग्ण नाईलाजास्तव बेडअभावी घरीच राहून उपचार घेत आहेत. मात्र त्यांना घरी सर्व सुविधा मिळत नसल्याने धोक्याचे प्रमाण वाढले आहे. आता सुरू असलेल्या कोविड सेंटरवर रुग्णांमुळे बेड, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, रेमडेसिविरचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे रुग्णांची उपचारासाठी वणवण चालू आहे. माण-खटावच्या जनतेचे हाल पाहवत नसल्याने आपण कोविड सेंटर उभारण्याचा निर्णय घेत आहोत. यासाठी तालुका प्रशासनाने किंवा रयतसारख्या एखाद्या शिक्षण संस्थेने आम्हाला तात्काळ जागा उपलब्ध करून दिली, तर अगदी आठवडाभरातसुध्दा आम्हाला कोविड सेंटर सुरू करता येईल.
आताच्या परिस्थितीत शाळा, कॉलेजपेक्षा आपली माणसं जगवणं महत्त्वाचं आहे. या सामाजिक जाणिवेतून सर्वांनी पुढे येऊन कोरोनाच्या महामारीचा सामना करणे गरजेचे आहे. त्यामुळे प्रशासनाला शक्य असल्यास त्यांनी जागा उपलब्ध करून द्यावी, अन्यथा दहिवडी कॉलेजने त्यांची जागा द्यावी म्हणजे त्याठिकाणी कोविड सेंटर सुरू करून कोरोनाबाधितांना दिलासा देता येईल.