मॅडमही म्हणतात, काय ‘द्या’चं बोला...
By admin | Published: February 1, 2015 12:58 AM2015-02-01T00:58:37+5:302015-02-01T01:00:18+5:30
चौघी गजाआड : कोल्हापुरात पदाधिकारी तर सातारा जिल्ह्यातही आहेत लाचखोर महिला अधिकारी, कर्मचारी
सातारा : महिला अधिकारी अथवा कर्मचारी लाच घेतात का, असा प्रश्न दोन दशकांपूर्वी साताऱ्यात कोणी विचारला तर त्याचे उत्तर नकारात्मक येत होते. मात्र, सुप्रिया बागवडे यांच्यावरील लाचखोरीच्या कारवाईनंतर या नकारात्मकतेचे परिवर्तन सकारात्मकतेत झाल्याचे समोर आले आहे. गेल्या तीन-चार वर्षांत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ज्या कारवाया केल्या, त्यामध्ये बागवडे यांच्यासह चार महिला लाच घेताना जाळ्यात सापडल्या आहेत. महिलांचे लाचखोरीचे प्रमाण जसे कमी आहे तसेच समोरच्या पार्टीकडून मागणीचे प्रमाणही त्या तुलनेत अतिशय नगण्य असल्याचे उघड झाले आहे.
कोल्हापूरच्या महापौर तृप्ती माळवी यांना लाच घेतल्याप्रकरणी ताब्यात घेतल्यानंतर राज्यभरात एकच खळबळ उडाली. राजकारणात एवढ्या मोठ्या पदावर पोहोचलेली आणि शहराच्या ‘फर्स्ट लेडी’ असणाऱ्या माळवी यांना लाचप्रकरणी ताब्यात घेतल्याचे वृत्त धडकताच अनेकांसाठी आश्चर्याचा धक्का होता. परिणामी एका बाजूला महिला राजकारणात सक्षम होत असतानाच दुसरीकडे त्या लाच घेण्यातही आता सरसावू लागल्या आहेत, असेच या निमित्ताने पुढे आले. महाराष्ट्र असो, अथवा सातारा. लाच घेताना जितक्या कारवाया झाल्या त्यामध्ये आजपर्यंत पुरुष अधिकाऱ्यांचाच वरचष्मा कायम आहे. मात्र, अलीकडच्या काही दिवसांत महिला अधिकारी, कर्मचारी, तलाठी लाच घेताना अटक होऊ लागल्या आहेत. साताऱ्यात गेल्या तीन-चार वर्षांत अशा प्रकारच्या चार घटना घडल्या आहेत.
सातारा जिल्ह्णात लाचखोर महिला अधिकाऱ्यांचा विचार करता सर्वात मोठी कारवाई खंडाळ्याच्या तत्कालीन तहसीलदार सुप्रिया बागवडे यांच्यावर झाली. सुप्रिया बागवडे यांना २० हजारांची लाच घेताना अटक झाल्यानंतर महाराष्ट्रात खळबळ उडाली. मुळातच तहसीलदार सुप्रिया बागवडे नेहमीच वादग्रस्त राहिल्या आहेत. जावळी ते खंडाळा असा त्यांचा प्रवास नेहमीच चर्चेत राहिला. निवडणूक कर्मचाऱ्यांचा भत्ता वाटपातील घोळ असो, अथवा अन्य कोणतीही घटना असो. प्रत्येक ठिकाणी त्यांच्याच नावाची चर्चा झाली. या प्रकारामुळे त्यांना तर एकदा जिल्हाधिकाऱ्यांनी नोटीसही बजावली होती.
महाराष्ट्रात ज्या-ज्या ठिकाणी शासकीय यंत्रणा कार्यान्वित आहेत, तेथे अशा किती तरी प्राप्तीकर खात्याच्या अतिरिक्त आयुक्त सुमित्रा बॅनर्जी, उस्मानाबाद येथील उपविभागीय अधिकारी शोभा राऊत, आजऱ्याच्या तत्कालीन तहसीलदार उज्ज्वला सोरटे, तत्कालीन तहसीलदार सुप्रिया बागवडे, अलीबाग येथील नगररचना सहायक संचालक दिशा सावंत, जत पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक सीमा आगवे आहेत. दरम्यान, एका पोलीस अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, सरसकट महिला अधिकारी अथवा कर्मचारी लाच घेतात, असे नाही.
काही महिला अधिकारी अथवा कर्मचारी लाच घेतात. मात्र, त्यांच्याविषयी कोणी तक्रारदार पुढे येत नाही. पदावर कार्यरत महिलांनी जर लाच मागितली तरी ती समोरच्या पार्टीला ती फारशी त्रासदायक नसते. परिणामी तक्रारदारही सुखावतो आणि महिला अधिकारी, कर्मचाऱ्यांचेही फावते. कोरेगावच का..?
कोरेगावात महसूल विभागात तीन महिलांना लाच घेताना अटक करण्यात आली. एका तक्रारदाराकडून महसूल विभागातील अव्वल कारकून सिमंतीनी गंगाराम कदम आणि अभिलेख उमेदवार आशालता पांडुरंग जाधव या दोघींनाही जुन्या रेकॉर्डच्या नकला देण्यासाठी लाच मागितली होती. मात्र, या दोघींनी लाच मागताना अतिशय वेगळी पद्धती वापरली होती.
जाधव ही अभिलेख उमेदवार असल्यामुळे तिने ‘तक्रारदाराकडे दोन हजार आज द्या आणि नकला न्यायला येणार त्यावेळी नंतरची रक्कम द्या,’ असे सांगितले होते. मात्र, हाच तक्रारदार सिमंतीनी कदम हिच्याकडे गेला. त्यावेळी ‘आज तीन हजार द्या आणि काम झाल्यानंतर तीन हजार द्या,’ असे म्हटल्या होत्या. मात्र, पैसे देण्याच्या वेळीच सातारच्या लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात कदम आणि जाधव अलगद सापडल्या गेल्या.
कोरेगाव तालुक्यातील अपशिंगे येथील तलाठी दिलशाद मुल्ला हिनेही सातबारा उतारा देण्यासाठी लाच मागितली होती. यानंतर ती लाच घेतानाच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडली. विशेष म्हणजे, खंडाळ्याच्या तत्कालीन तहसीलदार सुप्रिया बागवडे यांनीही कोरेगावच्या तहसीलदार म्हणून काम पाहिले होते.
महिला अधिकारी, कर्मचाऱ्यांचे कोडवर्ड
एक कागद म्हणजे शंभर रुपये ते एक हजार असे समजायचे
अनेकदा रक्कम हातवारे करून सांगितली जाते
कॅलक्युलेटर, मोबाईलवर आकडा आॅपरेट केला जातो
कागदावर आकडा लिहतात. नंतर कागद फाडून टाकला जातो.
‘उद्या बघू,’ असे सांगितले तर समोरून डिमांड आहे, असे समजायचे.
चहा, कॉफीमध्ये किती चमचे साखर यावरूनही मागणी ठरते.
तीस लाचखोर महिलांना महाराष्ट्रात अटक
महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाया सातशेहून अधिक आहेत. यापैकी तीस महिला आहेत. यामध्ये शासकीय अथवा लोकसेवकही आहेत. लाच घेणाऱ्या महिलांमध्ये उपविभागीय अधिकारी, अव्वल कारकून, अभिलेख उमेदवार, पोलीस उपनिरीक्षक, आरोग्य अधिकारी, तलाठी, मुख्याध्यापिका, नगरसेविका यांना लाच घेताना अटक झालेली आहे.