भुर्इंजच्या मदन दादांना बाबांची आॅफर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 11:07 PM2017-07-18T23:07:13+5:302017-07-18T23:30:20+5:30
भुर्इंजच्या मदन दादांना बाबांची आॅफर!
सागर गुजर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : किसनवीर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष व माजी आमदार मदन भोसले यांनी जिल्हा काँगे्रसचे नेतृत्व पुन्हा एकदा ताब्यात घ्यावे, अशी इच्छा माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली आहे. ही आॅफर आल्यानंतर मदनदादांनीसुध्दा नकार न देता विचार करायला वेळ मागितला आहे. येत्या दोन दिवसांत ते आपला निर्णय कळविण्याची शक्यता आहे.
कऱ्हाड येथे माजी खासदार दिवंगत प्रमिलाकाकी चव्हाण यांच्या स्मृतिदिनी अभिवादन करण्यासाठी मदन भोसले कऱ्हाडला बाबांच्या निवासस्थानी गेले होते, तेव्हा काही काळ या दोन नेत्यांची पक्ष बांधणीच्या अनुषंगाने सविस्तर चर्चा झाली. जिल्हाध्यक्ष निवडीवरुन काँगे्रसअंतर्गत सुरु असलेला संघर्ष वेदनादायी असल्याची भावना बाबांनी यावेळी व्यक्त केली होती.
जिल्हाध्यक्षपदासाठी काँगे्रसमधील सर्वसमावेशक चेहऱ्याला संधी द्यावी, अशी सर्वांचीच इच्छा असल्याने इतरांच्या नावाला विरोध होऊ शकतो, पण मदन भोसले यांच्या नावाला विरोध होणार नाही, असा बाबांचा कयास आहे. जिल्ह्यातील ११ पैकी ६ तालुक्यांचे कार्यक्षेत्र असणाऱ्या किसनवीर, खंडाळा व प्रतापगड या तीन साखर कारखान्यांचे नेतृत्व मदन भोसले करत आहेत. हे तिन्ही कारखाने उत्तमरित्या चालवून त्यांनी नेतृत्वाची चुणूक दाखवली आहे.
त्यामुळे काँगे्रसमधील वाद अधिक चिघळण्याआधी पक्षाची घडी मदन भोसले यांनी सावरावी, अशी इच्छा बाबांनी व्यक्त केली होती.
पृथ्वीराजबाबांनी व्यक्त केलेल्या इच्छेचा आदर करुन मदन भोसले यांनीही विरोध दर्शविला नाही; सध्या तीन कारखान्यांचा व्याप सांभाळत असताना जिल्हा काँगे्रसच्या संघटनात्मक कामासाठी कितपत वेळ द्यायला जमेल, हे सांगणे कठीण आहे. तरीही विचार करायला आपल्याला थोडा वेळ पाहिजे, असे सांगून आठ दिवसांत कळवतो, असे त्यांनी स्पष्ट केले होते.
किसनवीर, प्रतापगड, खंडाळा या तीन सहकारी साखर कारखान्यांचे नेतृत्व मदन भोसले करत आहेत. किसनवीरचे ५२ हजार, प्रतापगडचे १५ हजार तर खंडाळा साखर कारखान्याचे १४ हजार सभासद आहेत. या तिन्ही कारखान्यांच्या कार्यक्षेत्रावर मदन भोसले यांचा प्रभाव आहे. याचा काँगे्रसला ऊर्जितावस्था प्राप्त करुन देण्यासाठी उपयोग होऊ शकतो, असाच पृथ्वीराजबाबांचा आॅफर देण्यामागे विचार असावा.
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आधीच शकले पडून गलितगात्र झालेल्या काँगे्रसची आगामी काळात आणखी धूळधाण होण्याची शक्यता असल्याने जिल्हा काँगे्रसच्या नेतृत्वासाठी कोणाचाही विरोध होणार नाही, असा चेहरा देणे काँगे्रसजनांना अपेक्षित होते. मदन भोसले दोन दिवसांत आपला निर्णय कळवू शकतात. साहजिकच, त्यांनी होकार दिल्यास जिल्हाध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध होऊ शकते.
दरम्यान, मदन भोसले यांनी जून २00१ ते २00४ या अडीच वर्षांच्या कालावधीत जिल्हा काँगे्रसचे नेतृत्व केले होते. तेव्हा झेडपीत काँगे्रसचे २९ सदस्य होते. वाई, कऱ्हाड, कोरेगाव या पंचायत समिती काँगे्रसच्या ताब्यात होत्या. सध्याच्या घडीला झेडपीत सात सदस्य आहेत, तर ११ पैकी एकही पंचायत समिती ताब्यात नाही.
शिवेंद्रसिंहराजेही होते काँगे्रसमध्ये...
मदन भोसले काँगे्रसचे जिल्हाध्यक्ष असताना दिवंगत अभयसिंहराजे भोसले राष्ट्रवादीत गेले होते. पण त्यांचे पुत्र आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले व महत्त्वाचे मोहरे मदन भोसले यांच्या नेतृत्वाखालीच काम करत होते. त्यामुळे ‘राजे राष्ट्रवादीत अन ‘सन’ व सैन्य काँगे्रसमध्ये,’ अशी जोरदार चर्चा पूर्वी रंगली होती. मदन भोसलेंच्याच कारकीर्दीत महाबळेश्वरचे डी. एम. बावळेकर, पाचगणीच्या लक्ष्मी कऱ्हाडकर, माजी खासदार हिंदुराव नाईक-निंबाळकर यांनी काँगे्रसमध्ये प्रवेश केला होता. सध्याच्या घडीला लक्ष्मी कऱ्हाडकर या एकमेव काँगे्रसमध्ये आहेत.
मदन भोसले का होते नाराज ?
२00४ च्या विधानसभा निवडणुकीत काँगे्रस व राष्ट्रवादीने आघाडी केली होती. या आघाडीतील जागा वाटपात वाई विधानसभा मतदारसंघाचे तिकिट राष्ट्रवादीला देण्यात आले होते. तिकिट नाकारले गेल्याने नाराज झालेल्या मदन भोसले यांनी काँगे्रसच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देऊन अपक्ष निवडणूक लढली होती. तेव्हा ते अपक्ष आमदार म्हणून निवडून आले होते.