मदन पाटील सोडून सर्वांशी चर्चा!
By Admin | Published: June 25, 2015 01:05 AM2015-06-25T01:05:02+5:302015-06-25T01:08:05+5:30
काँग्रेसची बैठक : बाजार समिती निवडणूक; जिल्हा बँकेचाच फॉर्म्युला वापरणार
सांगली : सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी जिल्हा बँकेचाच फॉर्म्युला वापरण्याचा निर्णय बुधवारी झालेल्या काँग्रेसच्या बैठकीत घेण्यात आला. माजी मंत्री मदन पाटील यांच्याकडे चर्चेस स्वत:हून न जाण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. यामुळे मदन पाटील व विशाल पाटील यांच्यात या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समेट करण्याची प्रक्रिया फोल ठरली आहे.
सांगलीत बुधवारी सायंकाळी झालेल्या या बैठकीला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम, वसंतदादा साखर कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील, जिल्हा परिषदेचे सम्राट महाडिक यांच्यासह कवठेपिरानचे जिल्हा परिषद सदस्य आणि शिवसेनेचे नेते भीमराव माने आदी उपस्थित होते.
माजी मंत्री मदन पाटील यांनी जिल्हा बँकेच्या निवडणुकीत काँग्रेसशी कोणतीही चर्चा केली नव्हती. राष्ट्रवादी आणि भाजपशी युती करण्याचा निर्णय त्यांनी परस्परच घेतला होता. त्यामुळे त्या युतीविरोधात काँग्रेसमधील कदम गट आणि दादा गट एकत्र आले होते. बँकेतील निवडणुकीत झालेली कदम व दादा गटाची आघाडीच कायम ठेवण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.
मदन पाटील यांनी काँग्रेस नेत्यांशी चर्चा न करता जिल्हा बँकेत युती केली होती. त्यामुळे त्यांच्याशी स्वत:हून कोणतीही चर्चा न करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. ते स्वत:हून चर्चेसाठी आल्यास त्यांच्या प्रस्तावावरही विचार करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. राष्ट्रवादी व भाजपमधील जे कोणी काँग्रेससोबत येतील त्यांना काँग्रेसबरोबर घेण्यावर एकमत झाले. याबाबत अंतिम निर्णय येत्या दोन दिवसात घेण्यात येणार आहे.
मिरज पश्चिम भागात महाडिक गटासह भीमराव माने यांच्या गटाचीही ताकद आहे. त्यामुळे मोहनराव कदम व विशाल पाटील यांनी त्यांनाही सोबत घेतले आहे. महाडिक हे राष्ट्रवादीचे माजी मंत्री जयंत पाटील यांचे कट्टर विरोधक आहेत, तर भीमराव माने विधानसभा निवडणुकीपासून जयंत पाटील यांच्याशी फारकत घेऊन शिवसेनेत गेले आहेत. (प्रतिनिधी)