माढ्यात निशाना लागेना; साताऱ्यात थांबा अन् पाहा...
By नितीन काळेल | Published: April 6, 2024 07:37 PM2024-04-06T19:37:49+5:302024-04-06T19:37:58+5:30
अर्ज भरण्याची वेळ जवळ : लोकसभा उमेदवार निवडीला गुढीपाडव्याचा मुहूर्त लागणार !
सातारा: लोकसभेसाठी अर्ज भरण्याची वेळ जवळ आली असतानाही सातारा आणि माढा मतदारसंघातील चित्र स्पष्ट नाही. आघाडीत राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडे दोन्हीही मतदारसंघ असतानाही त्यांचा बरोबर निशाणा लागलेला नाही. तर महायुतीत सातारा कोणाकडे हे ठरले नाही. त्यामुळे सर्वांनाच उमेदवारांची प्रतीक्षा असून गुढीपाडव्यावेळीच मुहूर्त लागण्याची चिन्हे आहेत.
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर राज्यातील राजकीय चित्र बदलले आहे. याचा प्रत्यय आता लोकसभा निवडणुकीमुळे येऊ लागलाय. कारण, महायुतीत अजूनही मतदारसंघ कोणाकडे यावरूनच रस्सीखेच पहायला मिळत आहे. तर आघाडीत बऱ्यापैकी एकसंधता असतानाही उमेदवार ठरविण्यावरून मागे-पुढे पाहिले जात आहे. यामुळे अनेक मतदारसंघाचा तिढा सुटलेला नाही. यामध्ये सातारा आणि माढा मतदारसंघाचा समावेश आहे.
सातारा मतदारसंघ आघाडीत राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडे आहे. पण, आताच्या निवडणुकीत प्रथमच उमेदवार ठरविताना पवार यांना विचार करावा लागत आहे. विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांनी प्रकृतीच्या कारणावरून माघार घेतली असल्याने कोणाला रिंगणात उतरवयाचे यावरच खल सुरू आहे. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला अबाधित राखायचा असेल तर महायुतीच्या उमेदवाराला टक्कर देणाराच उमेदवार उतरवावा लागणार आहे. त्यामुळेच महायुतीत मतदारसंघ कोणाकडे जातो आणि उमेदवार कोण यावरच ते गणित मांडू शकतात. यासाठी तरी पवार यांनी उमेदवार जाहीर केला नसावा ना, अशी शंका येत आहे. तरीही राष्ट्रवादीकडून सध्यातरी आमदार शशिकांत शिंदे यांचे नाव चर्चेत आहे.
महायुतीत भाजप का राष्ट्रवादीचा अजित पवार गट साताऱ्याची निवडणूक लढविणार हा पेच संपलेला नाही. दोघांनाही सातारा मतदारसंघ हवा आहे. भाजपला मतदारसंघ सुटण्याची चिन्हे असली तरी राज्यातील इतर मतदारसंघांचा तिढा सुटल्याशिवाय सातारा कोणाकडे जाणार हे ठरणार नाही. त्यामुळे सध्या साताऱ्याबाबतही महायुतीत प्रतीक्षा आहे. पण, भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी मतदारसंघात भेटी सुरू केल्या आहेत. तर अजित पवार गट शांततेत असल्याचे दिसून येत आहे. तरीही १२ एप्रिलपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. त्यापूर्वीच म्हणजे गुढीपाडव्याचा मुहूर्त साधून उमेदवार जाहीर होतील, अशी नवी माहिती समोर येत आहे.
गळ लागला की माढ्याचा उमेदवार ठरणार...
माढा मतदारसंघात भाजपने रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना दुसऱ्यांदा उमेदवारी देऊन आघाडी घेतली. पण, घरातूनच उमेदवारीला विरोध झालाय. भाजपचे सोलापूर जिल्हा संघटक धैर्यशील मोहिते-पाटील वेगळ्या वाटेवर जाण्याची चिन्हे आहेत. त्यातच महायुतीतीलच रामराजे नाईक-निंबाळकर हेही मोहिते यांच्याबरोबर आहेत. यामुळे माढ्यात वेगळंच राजकारण रंगू लागले आहे. या घडामोडीकडे शरद पवार हेही लक्ष ठेवून आहेत. त्यांनाही मतदारसंघात तगड्या उमेदवाराची गरज आहे. असा उमेदवार अकलूजच्या मोहिते-पाटील किंवा फलटणच्या रामराजे यांच्या घरातूनच मिळू शकतो, हेही स्पष्ट आहे. त्यामुळे पवार हे अशा उमदेवारासाठी गळ टाकून आहेत. गळ लागला तर ठीक नाहीतर दुसरे पर्यायही त्यांनी समोर ठेवल्याची माहिती मिळत आहे. अशा कारणातूनच अजूनही राष्ट्रवादीचा उमेदवार निश्चित झालेला नाही.