माढा लोकसभा मतदारसंघ :महायुतीचं ठरलं; आघाडीतील इच्छुक देव पाण्यात घालून...

By नितीन काळेल | Published: March 22, 2024 07:46 PM2024-03-22T19:46:11+5:302024-03-22T19:48:07+5:30

Madha Lok Sabha Constituency: माढा लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीने उमेदवार जाहीर करुन पुढचे पाऊल टाकले असलेतरी महाविकास आघाडीतील राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून अजुनही कोणाचेच नाव स्पष्ट झालेले नाही. त्याचबरोबर रासपचे महादेव जानकर यांनाही अजून आघाडीत घेणार की नाही हे ही निश्चीत नाही.

Madha Lok Sabha Constituency: Mahayuti decided; Put the willing gods in the front... | माढा लोकसभा मतदारसंघ :महायुतीचं ठरलं; आघाडीतील इच्छुक देव पाण्यात घालून...

माढा लोकसभा मतदारसंघ :महायुतीचं ठरलं; आघाडीतील इच्छुक देव पाण्यात घालून...

- नितीन काळेल
सातारा - माढा लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीने उमेदवार जाहीर करुन पुढचे पाऊल टाकले असलेतरी महाविकास आघाडीतील राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून अजुनही कोणाचेच नाव स्पष्ट झालेले नाही. त्याचबरोबर रासपचे महादेव जानकर यांनाही अजून आघाडीत घेणार की नाही हे ही निश्चीत नाही. त्यामुळे आघाडीकडून इच्छुक असणारे देव पाण्यात घालून बसले आहेत.

माढा मतदारसंघ अस्तित्वात आल्यापासून आतापर्यंत तीन निवडणुका झाल्या आहेत. आताची निवडणूक चाैथी असलीतरी उमेदवारीवरुनच चर्चा झडू लागल्या आहेत. महायुतीतून भाजपने विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना उमेदवारी दिली. पण, त्यांच्या विरोधात महायुतीतूनच उठाव झाला आहे. तरीही खासदारांनी या नाराजीकडे डोळेझाक करुन प्रचाराला सुरूवात केली आहे. तर भाजपचे सोलापूर जिल्हा संघटक धैर्यशील मोहिते-पाटील यांचीही नाराजी दूर झालेली नाही. त्यामुळे त्यांनीही मतदारसंघात गावभेटी सुरू ठेवल्यात. असे असतानाच महाविकास आघाडीचा उमेदवार अजून निश्चित नाही. त्यातच माढा मतदारसंघ आघाडीत राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडेच राहणार आहे. तरीही त्यांनी अजून कोणालाही हिरवा कंदील दाखवलेला नाही.

आघाडीतील शरद पवार गटाकडून अभयसिंह जगताप यांनी दोन महिन्यांपासून तयारी केलेली. मतदारसंघात अनेक कार्यक्रम घेतले. सध्याही त्यांच्या गावभेटी सुरू आहेत. पण, त्यांनाही अजून शरद पवार यांनी वेटींगवर ठेवलेले आहे. त्यातच सध्या महायुतीत खासदारांच्या उमेदवारीवरुन नाराजीनाट्य सुरू आहे. यामधूनच कोणी राष्ट्रवादीत येण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळेही शरद पवार यांनी उमेदवार देण्याची गडबड केली नसल्याची माहितीही समोर येत आहे. कारण, आज शरद पवार गटाकडे माढ्याततरी एकही ताकदवान उमेदवार नाही. मतदारसंघातील सर्व आमदार हे महायुतीत आहेत. अशावेळी शरद पवार हे महायुतीतील नाराजांना बरोबर घेऊन तुल्यबळ लढत घडवू शकतात. यासाठी त्यांनी सध्यातरी शांततेचे धोरण स्वीकारल्याचे सांगण्यात येत आहे. तर दुसरीकडे रासपचे महादवे जानकर आणि शरद पवार यांच्यात अनेकवेळा माढा मतदारसंघासाठी भेट झाली आहे. तरीही जानकर यांना ठामपणे काहीच आश्वासन मिळाले नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे शरद पवार यांच्या मनात काय ? हे समजाण्यासाठी अजून काही दिवस जावे लागणार हे निश्चीत.
 
जानकर माढ्यात उतरणे महायुतीसाठी ठरणार धक्का 
आघाडीबरोबर जाऊन रासपचे महादेव जानकर माढ्यातून लढण्याची अधिक शक्यता आहे. पण, चर्चेशिवाय पुढे काहीच होत नाही. शुक्रवारीही शरद पवार यांनी माढ्याची जागा जानकर यांनी लढावी, अशी माझी वैयक्तीक मागणी आहे, असेही स्पष्ट केले. पण, मागील १५ दिवसांपासूनच्या राजकीय घडामोडी पाहता माढ्याबाबत पवार यांनी सावध भूमिका घेतल्याचे दिसत आहे. मतदारसंघ त्यांच्याकडेच राहणार असलातरी त्यांच्या मनात काय चालले आहे, हेच समजणे अवघड झाले आहे. तरीही महादेव जानकर आघाडीत जाऊन लढल्यास महायुतीसाठी हा मोठा धक्का ठरणार हे स्पष्ट आहे.

Web Title: Madha Lok Sabha Constituency: Mahayuti decided; Put the willing gods in the front...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.