सातारा: शायनिंग करायची नाय.. मला शिकवायचं नाही, जिल्हाधिकारी कार्यालयातच ठेकेदाराची मग्रुरीची भाषा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2022 03:41 PM2022-10-11T15:41:39+5:302022-10-11T15:42:00+5:30

दमदाटीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होवू लागले. या प्रकाराची दिवसभर उलटसुलट चर्चा सुरू होती.

Magruri language of contractor in Satara Collectorate office itself | सातारा: शायनिंग करायची नाय.. मला शिकवायचं नाही, जिल्हाधिकारी कार्यालयातच ठेकेदाराची मग्रुरीची भाषा

सातारा: शायनिंग करायची नाय.. मला शिकवायचं नाही, जिल्हाधिकारी कार्यालयातच ठेकेदाराची मग्रुरीची भाषा

googlenewsNext

सातारा : कोरेगाव तालुक्यातला जळगाव डेपो बंद करण्यावरून केंद्र सरकारच्या अन्न विभागाचे मुख्य प्रबंधक आशुतोष सिंग व अन्न पुरवठा ठेकेदार फिरोज पठाण यांच्यात जिल्हाधिकारी यांच्या दालनाबाहेरच बाचाबाची झाली. पठाण यांनी एकेरीवर येत शायनिंग करायची नाय.. इथे येऊन मला शिकवायचे नाय.. अशी बिहारस्टाईल दमबाजी केली. जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयातच ठेकेदार अशी अरेरावी करू लागल्याने कार्यालयात याची दिवसभर चर्चा सुरू होती.

जिल्हाधिकारी कार्यालयात दिवाळीच्या अनुषंगाने अन्नपुरवठा व्यवस्थेबाबत बैठक झाली. केंद्र सरकारच्या अन्न विभागाचे मुख्य प्रबंधक आशुतोष सिंग हे बैठकीसाठी आले होते. माथाडी कामगार संघटनेचे नेते आमदार शशिकांत शिंदे, अन्नपुरवठा ठेकेदार फिरोज पठाण व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी आशुतोष सिंग यांनी जळगाव डेपो बंद करण्याचा मुद्दा मांडला. त्यास आमदार शिंदे यांनी २०० माथाडी कामगारांच्या रोजगाराचा मुद्दा उपस्थित करत विरोध दर्शवला. फिरोज पठाण यांनी दिवाळीच्या सणाला अन्न वितरण प्रक्रिया सुरळीत होण्याच्या दृष्टीने डेपो बंद होऊ नये, गोदामाची व्यवस्था अन्यत्र वळवावी लागणार अशी बाजू मांडली.

यानंतर आमदार शिंदे हे जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करत होते. यावेळी पठाण व सिंग दालनाबाहेर आले होते. डेपो बंद केल्यास इतर काय पर्याय आहे, याची चर्चा करण्यासाठी शिंदे यांच्याकडे जाण्याचा आग्रह पठाण यांनी धरला. परंतु, त्यास सिंग यांनी नकार दिला. यामुळे पठाण व सिंग यांच्यात बाचाबाची झाली. चिडलेले पठाण एकेरीवर आले. शायनिंग करून सांगायचं नाही, मला शिकवायचं नाही असे सांगितले.

याबाबत जिल्हा प्रशासनाने बैठक शांततेत झाल्याचे सांगत अधिक भाष्य करण्याचे टाळले. परंतु, दमदाटीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होवू लागले. या प्रकाराची दिवसभर उलटसुलट चर्चा सुरू होती.

Web Title: Magruri language of contractor in Satara Collectorate office itself

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.