महाबळेश्वर : ऐन गणेशोत्सवात आगाराचे वेळापत्रक बिघडले, प्रवाशांची ससेहोलपट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2018 16:31 IST2018-09-13T16:25:59+5:302018-09-13T16:31:45+5:30
महाबळेश्वर आगाराचे वेळापत्रक पूर्णपणे विस्कळीत झाले असून, आगाराची कोणतीच गाडी नियमितपणे धावत नसल्याने महाबळेश्वरसारख्या दुर्गम व डोंगराळ विभागातील प्रवाशांना तसेच बाहेरून येणाऱ्या पर्यटकांना रोजच मनस्ताप सहन करावा लागत आहे. यामुळे प्रवाशांमधून तीव्र नाराजी व संताप व्यक्त केला आहे.

महाबळेश्वर : ऐन गणेशोत्सवात आगाराचे वेळापत्रक बिघडले, प्रवाशांची ससेहोलपट
महाबळेश्वर : आगाराचे वेळापत्रक पूर्णपणे विस्कळीत झाले असून, आगाराची कोणतीच गाडी नियमितपणे धावत नसल्याने महाबळेश्वरसारख्या दुर्गम व डोंगराळ विभागातील प्रवाशांना तसेच बाहेरून येणाऱ्या पर्यटकांना रोजच मनस्ताप सहन करावा लागत आहे. यामुळे प्रवाशांमधून तीव्र नाराजी व संताप व्यक्त केला आहे.
ऐन गणेशोत्सव कालावधीतच एसटीचे वेळापत्रक कोलमडल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. महाबळेश्वर हा जिल्ह्यातील अत्यंत दुर्गम व डोंगराळ तालुका आहे. महाबळेश्वर हे तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे. दळणवळणासाठी, बाजारहाटासाठी, शैक्षणिक तसेच शासकीय कामांसाठी तालुक्यातील सर्वसामान्य जनतेला महाबळेश्वरला रोज येणे-जाणे असते.
ग्रामीण भागातून महाबळेश्वरला येणाऱ्या सर्वसामान्य जनतेला एसटी हेच एकमेव माध्यम आहे. सकाळी गावातून सुटणाऱ्या पहिल्या गाडीने महाबळेश्वरला येऊन दिवसभर कामे करून संध्याकाळी मुक्कामाच्या गाडीने घरी परत जायचे.
असा दैनंदिन दिनक्रम येथील नागरिकांचा असतो. मात्र गेल्या तीन ते चार महिन्यांपासून महाबळेश्वर आगाराच्या एसटी बसचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सर्वसामान्य प्रवासी, नोकरदार व शालेय विद्यार्थ्यांना रोजच त्रास सहन करावा लागत आहे.
तासन्तास बसस्थानकावर गाडीची वाट पाहावी लागत असल्याने प्रवाशांच्या संयमाचा बांध आता फुटू लागला आहे. लांब पल्ल्याच्या गाड्यांचेही वेळापत्रक कोलमडले आहे. तसेच ग्रामीण भागात जाणाऱ्या गाड्या तर रोजच ब्रेकडाऊन होत आहेत. असा एकही दिवस जात नाही की कुठलीच गाडी पंक्चर झाली नाही.
वाहने जुनी झाली आहेत. त्यामुळे त्यांचे स्पेअर पार्ट मिळत नसल्याने नाईलाजास्तव गाड्या बंद ठेवाव्या लागतात. कमी गाड्यांमध्ये नियोजन करताना अनेक अडचणी येतात. तसेच प्रवाशांच्या सुरक्षेसाठी गाड्या बंद ठेवाव्या लागत आहेत. नवीन गाड्यांची मागणी करून देखील मिळत नसल्याने जुन्या गाड्या चालवाव्या लागत आहेत.
-एन. पी. पतंगे,
आगार व्यवस्थापक