महाबळेश्वरात ‘आबा-बापूं’चं गुफ्तगू!
By Admin | Published: February 25, 2015 11:24 PM2015-02-25T23:24:36+5:302015-02-26T00:08:39+5:30
स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ : राजकीय गढूळ वातावरण स्वच्छ करणार की काय?
महाबळेश्वर : गेल्या अनेक दिवसांपासून महाबळेश्वरचे राजकीय वातावरण विविध कारणांवरून ढवळून निघाले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे पालकमंत्री विजय शिवतारे व राष्ट्रवादीचे आमदार मकरंद पाटील हे महाबळेश्वरमधील ‘स्वच्छ सुंदर महाबळेश्वर’ या कार्यक्रमात मंगळवारी एकत्र आले. व्यासपीठावर दोघांनीही एकमेकांच्या कानात बराच वेळ गुफ्तगू केले. यामुळे हे दोन्ही नेते आता एकत्र येऊन महाबळेश्वरच्या गढूळ वातावरणाची स्वच्छता करणार की काय? अशी चर्चा होऊ लागली
आहे.महाबळेश्वरमध्ये दि. २४ रोजी ‘ग्रीन महाबळेश्वर व सुंदर महाबळेश्वर’ या अभियानाचा प्रारंभ झाला. यावेळी पालकमंत्री विजय शिवतारे, अभिनेते आदेश बांदेकर, आ. मकरंद पाटील, नगराध्यक्षा उज्ज्वला तोष्णिवाल यांसह मान्यवर उपस्थित होते.
महाबळेश्वर पालिकेत झालेल्या सत्तांतरानंतर महाबळेश्वरमधील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. सत्ताधारी असो वा विरोधक. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीत मात्र शहराचा विकास भरकटला आहे. गेल्यावर्षी मार्च महिन्यात येथील वाहनतळाचे भूमिपूजन करण्यात आले होते. असे असताना सत्ताधाऱ्यांनी याच वाहनतळाचे दुसऱ्यांदा भूमिपूजन सोहळा आयोजित केला. यासाठी कार्यक्रमपत्रिका छापण्यात आली होती. मात्र या पत्रिकेत पालकमंत्री विजय शिवतारे व खासदार उदयनराजे भोसले यांच्या नावाचा उल्लेख टाळल्याने शिवसैनिकांनी कार्यक्रमात गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला होता.
अशा अनेक कारणांमुळे महाबळेश्वरच्या राजकीय वातावरण दूषित झालेले असतानाच मंगळवारच्या कार्यक्रमात मात्र पालकमंत्री विजय शिवतारे आणि आ. मकरंद पाटील एकाच व्यासपीठावर एकमेकांच्या मांडीला मांडी लावून बसले होते. यावेळी दोघांनी एकमेंकांशी बराच वेळ गुफ्तगू केले. हे गुफ्तगू नेमके कोणत्या विषयावर होते, याबाबत मात्र अनभिज्ञ असले तरी,
पालकमंत्री व आमदार
यांच्यातील जवळीक व चर्चेने पुढील काळात महाबळेश्वरमध्ये पसरलेले दूषित वातावरण स्वच्छ होईल, अशीच चर्चा नागरिकांमध्ये होऊ लागली
आहे. (प्रतिनिधी)
पर्यटकांच्या समस्या सुटणार?
महाबळेश्वरमध्ये अस्वच्छता व नियोजनाचा अभाव पर्यटकांना नेहमीच पाहावयास मिळतो. हे टाळणे सहज शक्य असताना स्थानिक प्रशासन मात्र याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करत आहे. प्रवासी गाड्यांसाठी आधुनिक पद्धतीच्या सुविधा, आकर्षक दुभाजक तसेच वेण्णा लेकवरील भिंतीवर लँड स्केप, ग्रामीण रुग्णालय, वृक्षतोड, अनधिकृत बांधकाम अशा अनेक समस्यांनी महाबळेश्वर ग्रासले आले. पालकमंत्री विजय शिवतारे व आमदार मकरंद पाटील या बाबींंकडे गांभीर्याने लक्ष देतील, अशी चर्चा ही आता होऊ लागली आहे.