नामकरणाच्या निषेधार्थ महाबळेश्वर बंद

By admin | Published: March 22, 2017 10:46 PM2017-03-22T22:46:27+5:302017-03-22T22:46:27+5:30

संभाजी महाराज प्रेमींचा पालिकेवर मोर्चा : मुख्याधिकाऱ्यांना निवेदन; वाहनतळाचा ठराव रद्द करण्याची मागणी

Mahabaleshwar closed for protesting nomination | नामकरणाच्या निषेधार्थ महाबळेश्वर बंद

नामकरणाच्या निषेधार्थ महाबळेश्वर बंद

Next

महाबळेश्वर : येथील ‘रे-गार्डन’ वाहनतळाचे नामकरण ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाहनतळ’ असे करण्यात आले. मंगळवारी झालेल्या विशेष सभेत हा निर्णय घेण्यात आला असून, या निर्णयाविरोधात बुधवारी (दि. २२) संभाजी महाराज प्रेमींनी पुकारलेल्या महाबळेश्वर बंदला व्यापाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पालिकेच्या या निर्णयाचा श्रीराम मंदिरात झालेल्या बैठकीत निषेध करण्यात आला. यानंतर पालिकेवर मोर्चा काढण्यात आला. दरम्यान, मुख्याधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनात नामकरणाचा ठराव रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे.
महाबळेश्वर पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी खासदार उदयनराजे भोसले यांनी तत्कालीन नगराध्यक्ष संतोष आखाडे यांच्या समवेत येथील ‘रे-गार्डन’ वाहनतळाची पाहणी केली होती. तसेच वेण्णा दर्शन विश्रामगृहावर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी वाहनतळास ‘धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज वाहनतळ’ असे नाव देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार रे-गार्डन वाहनतळावर ‘छत्रपती संभाजी महाराज वाहनतळ’ या नावाचा फलकही लावण्यात आला.
दरम्यान, पालिकेने रे-गार्डन या वाहनतळास नाव दिले नसल्याचे कारण पुढे करीत मंगळवारी (दि. २१) झालेल्या सर्वसाधारण सभेत ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाहनतळ’ असे नामकरण करण्याचा ठराव सभेत मंजूर करण्यात
आला. पालिकेने असा ठराव करू नये व वाहनतळाचे नाव बदलू नये यासाठी शहरातील संभाजी महाराज प्रेमी सभा चालू असताना तेथे पोहोचले. त्या ठिकाणी असलेल्या
नगराध्यक्षा व नगरसेवकांना वाहनतळाने नामकरण करू नये, अशी मागणी केली होती. मात्र, पालिकेच्या सर्वसाधारण सभेने वाहनतळाचे नाव ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाहनतळ’ असे करण्याचा निर्णय घेतला व तसा ठराव देखील मंजूर केला.
त्यानंतर संभाजी महाराज प्रेमींंनी पालिकेच्या विरोधात बुुधवारी महाबळेश्वर शहर बंदची हाक दिली होती. त्यानुसार शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. मुख्य
बाजारपेठ, शिवाजी चौक, सुभाष चौक, महात्मा गांधी मार्केट, रे-गार्डन मार्केट या मुख्य ठिकाणांसह वेण्णा लेक येथील दुकाने बंद होती. त्यामुळे सर्वत्र दिवसभर शुकशुकाट पसरला होता.
पालिकेच्या निर्णयाविरोधात आयोजित करण्यात आलेल्या निषेध सभेत माजी नगराध्यक्ष डी. एम. बावळेकर, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख राजेश कुंभारदरे, पी. डी. पारठे, हरिभाऊ संकपाळ, संतोष शिंदे, वाई येथील संदीप जायगुडे, यशवंत घाडगे, विजय नायडू, नितीन भिलारे, विजय भिलारे, शांताराम धनावडे, गणेश उतेकर, विलास काळे यांनी आपले विचार मांडले सभेस शिवसेनेच्या जिल्हा परिषद सदस्या प्रणिता जंगम, लिलाताई शिंदे,
गोपाळ वागदरे, धोंडिराम जाधव, हेमंत शिंदे, सुनील साळुंखे, कॉँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस सलीम बागवान, पंचायत समिती सदस्य आनंदा उतेकर, युवा सेनेचे उपजिल्हा
प्रमुख सचिन वागदरे, माजी नगराध्यक्ष संतोष आखाडे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आंदोलनाच्या पार्श्वभूीमवर महाबळेश्वर येथे मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी आर. आर. पाटील महाबळेश्वरात तळ ठोकून आहेत. (प्रतिनिधी)



ठराव रद्द न केल्यास तीव्र आंदोलन
महाबळेश्वर पालिकेने घेतलेल्या या निर्णयाचा निषेध करण्यासाठी बुधवारी येथील श्रीराम मंदीरात छत्रपती संभाजी महाराज प्रेमींची जाहीर सभा आयोजित करण्यात आली. या सभेस वाई येथील शिवप्रतिष्ठान कार्यकर्त्यांसह विविध हिंदुत्ववादी संघटनाचे पदाधिकारी बैठकीस उपस्थित होते. या सभेत अनेकांनी आपले विचार मांडले. पालिकेने जरी नामांतराचा ठराव केला असला तरी नामांतर होऊ दिले जाणार नाही. ‘जर फलकाला हात लावाल तर याद राखा’ अशा शब्दात अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. पालिकेने हा ठराव रद्द करावा अन्यथा आंदोलनाची तीव्रता वाढेल, असा इशाराही देण्यात आला. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास पालिकेचे लोकप्रतिनिधी जबाबदार असतील, असा जाहीर इशारा यावेळी देण्यात आला.

... तो पर्यंत महाबळेश्वर बंद
सभेनंतर संभाजी प्रेमी कार्यकर्ते शिवाजी महाराज चौकात जमा झाले. तेथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मोर्चास प्रारंभ झाला. बाजारपेठ मार्गे मोर्चा थेट नगरपालिकेवर गेला. बंदोबस्तासाठी असलेल्या उपविभागीय पोलिस अधिकारी आर. आर. पाटील व पोलिस निरीक्षक राजेंद्र राजमाने यांनी पालिकेच्या प्रेवशद्वारावर मोर्चा अडविला व केवळ शिष्टमंडळाला पालिकेत प्रेवश देण्यात आला. शिष्टमंडळाने वाहनतळाच्या नामांतराचा ठराव रद्द करण्याच्या मागणीचे निवेदन मुख्याधिकाऱ्यांना दिले. नामांतराचा ठराव पालिका मागे घेत नाही तोवर महाबळेश्वर बंद राहील, असे निवेदनात नमूद केले आहे.


बाबासाहेबांच्या पुतळ्याबाबत मुख्याधिकारी अनभिज्ञ

पालिकेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसराचे सुशोभीकरण सुरू आहे. या कामानिमित्त काढलेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा कोठे आहे याची विचारणा शिष्टमंडळाने मुख्याधिकारी आशा राऊत यांना केली. मात्र, त्यांना समाधानकारक उत्तर मिळाले नाही. त्यांनी मुख्य लिपिक व अभियंता यांना बोलावले व अर्ध पुतळ्याबाबत विचारणा केली.
परंतु तेथे कोणालाच ठामपणे काही सांगता आले नाही. त्यामुळे मुख्याधिकारी यांच्या दालणात गोंधळ सुरू झाला. जो वर पुतळा कोठे आहे याची माहिती मिळत नाही तो पर्यंत आम्ही परत जाणार नाही, अशी भूमिका शिष्टमंडळाने घेतली व तेथेच ठिय्या मारला.
मुख्याधिकारी यांनी या संदर्भात लेखी खुलासा द्यावा, अशी शिष्टमंडळाने मागणी केली. शेवटी एक तासाच्या चर्चेनंतर मुख्याधिकारी आशा राऊत यांनी शिष्टमंडळाला पुतळा पालिकेत नाही व तो कोठे आहे याचा तातडीने शोध घेतला जाईल, असे लेखी पत्र दिले.

Web Title: Mahabaleshwar closed for protesting nomination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.