महाबळेश्वर, पाचगणीचा विकास अन शासकीय मेडिकल कॉलेज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:42 AM2021-03-09T04:42:41+5:302021-03-09T04:42:41+5:30
सातारा : राज्याच्या अर्थसंकल्पात सातारा जिल्ह्यातील चार प्रमुख विकासकामांसाठी आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. सातारकरांचे स्वप्न असलेले शासकीय वैद्यकीय ...
सातारा : राज्याच्या अर्थसंकल्पात सातारा जिल्ह्यातील चार प्रमुख विकासकामांसाठी आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. सातारकरांचे स्वप्न असलेले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, महाबळेश्वर, पाचगणी शहरांचा पर्यटन विकास आराखडा, सातारा सैनिक स्कूलला घसघशीत निधी अन पाटण तालुक्यात पोलीस प्रशिक्षण केंद्र या महत्त्वाच्या बाबी साताऱ्यासाठी मिळालेल्या आहेत.
राज्यातील शिवसेना, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्या महाविकास आघाडी सरकारने सातारा जिल्ह्यातील शाश्वत विकासकामांना मंजुरी देण्यावर भर दिलेला आहे. विविध विकासकामांच्या अनुषंगाने घोषणा झाल्यानंतर गेल्या सहा महिन्यांपासून राज्य सरकारच्या हालचाली दिसत होत्या. आता अर्थसंकल्पात निधीची तरतूद झाली असल्याने या विकासकामांच्या पूर्ततेचा मार्ग मोकळा झालेला आहे.
सातारा जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारणीचे काम गेल्या १० वर्षांपासून अडले होते. कृष्णा खोरे विकास महामंडळाची जागा वैद्यकीय शिक्षण विभागाकडे वर्ग केली गेली आहे. आता हे काम कधी सुरु होणार, याबाबत सातारकरांना उत्सुकता लागलेली आहे. शासनातर्फे या महाविद्यालयासाठी निधीची वारंवार घोषणाही करण्यात आली होती. स्थानिक लोकप्रतिनिधींकडून त्यासाठी पाठपुरावा सुरु असल्याने शासनातर्फे अर्थसंकल्पात महाविद्यालयाच्या उभारणीसाठी आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. आता लवकरात लवकर हे काम मार्गी लागावे, अशी सातारकरांची अपेक्षा आहे. या महाविद्यालयामुळे गोरगरीब लोकांच्या आरोग्याचा प्रश्न सुटेल तसेच जिल्हा शासकीय रुग्णालयावर असलेला ताणदेखील कमी होणार आहे.
दरम्यान, महाबळेश्वर - पाचगणी या पर्यटनस्थळांचा विकास आराखडा शासनाने तयार केलेला असून, अर्थसंकल्पामध्ये १०० कोटी रुपयांची आर्थिक तरतूद केलेली आहे. साताऱ्यातील प्रसिध्द सैनिक स्कूलसाठी निधीची तरतूद करण्याची मागणी लोकप्रतिनिधींकडून केली गेली होती. आता तब्बल ३०० कोटी रुपये राज्य शासनातर्फे दिले जाणार? आहेत. त्यातील १०० प्रत्येक वर्षी दिले जाणार? आहेत. पाटण तालुक्यामध्ये सुसज्ज पोलीस प्रशिक्षण केंद्र सुरु करण्यासाठी गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांचा पाठपुरावा सुरु होता. आता त्याला हिरवा कंदील मिळाला तसेच निधीची तरतूददेखील झाल्याने ही शाश्वत विकासकामे मार्गी लागणार आहेत. सातारा जिल्ह्यातील ग्रामीण रस्त्यांची चाळण झालेली आहे. राज्याच्या अर्थसंकल्पात संपूर्ण राज्यातील ग्रामीण रस्त्यांसाठी तरतूद केलेली आहे, त्यातील किती निधी सातारा जिल्ह्यासाठी दिला जाणार? याबाबत उत्सुकता आहे.
अर्थसंकल्पातून राज्यासह जिल्ह्यालाही मिळणारे फायदे
- शेतकऱ्यांना ३ लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज
- पक्का गोठा बांधण्यासाठी अनुदान
- कृषीपंपाला सौरवीज
- पशुसंवर्धन, मत्स्य व्यवसायाला उभारी
- जलसंपदा विभागासाठी मोठी आर्थिक तरतूद
- राजीव गांधी विज्ञान विद्यापीठ
- शाळकरी मुलींना मोफत एसटी पास
- कृषी पर्यटनाबाबत नवीन धोरण
- शासकीय रुग्णालयांमध्ये अग्निशमन यंत्रणा
- जिल्ह्यात कोविड उपचार केंद्र
- राजीव गांधी आयटी पार्क