महाबळेश्वर गारठले; साताऱ्याचा पारा १२ अंशावर
By नितीन काळेल | Published: January 18, 2024 07:19 PM2024-01-18T19:19:51+5:302024-01-18T19:21:09+5:30
सातारा : जिल्ह्यातील वातावरणात पाच दिवसांपासून शीतलहर असून पारा खालावला आहे. सातारा शहरात तर १२ अंशापर्यंत किमान तापमान आले ...
सातारा : जिल्ह्यातील वातावरणात पाच दिवसांपासून शीतलहर असून पारा खालावला आहे. सातारा शहरात तर १२ अंशापर्यंत किमान तापमान आले आहे. तर महाबळेश्वरही गारठले असून हुडहुडी वाढली आहे. त्यामुळे सध्या नागरिकांना कडाक्याच्या थंडीशी सामना करावा लागत असून जनजीवनावरही परिणाम होऊ लागला आहे.
जिल्ह्यात दरवर्षी नोव्हेंबर महिन्यापासून थंडीला सुरूवात होते. मात्र, यावर्षी थंडीला उशिरा सुरूवात झाली. संपूर्ण नोव्हेंबर महिना थंडीविना गेला. कारण, कायम किमान तापमान २० अंशापर्यंत होते. डिसेंबर महिना उजाडलातरी थंडी कमी होते. पण, डिसेंबरच्या मध्यानंतर थंडी जाणवू लागली. त्यावेळी १३ अंशापर्यंत खाली जिल्ह्याचा पारा आला होता. महाबळेश्वरलाही १२ अंशापर्यंत तापमान घसरले होते. पण, दोन दिवसांतच पारा वाढत गेला. त्यामुळे थंडीही गायब झाली होती.
परिणामी यंदा कडाक्याची थंडी पडणार नाही असा अंदाज बांधण्यात येत होता. मात्र, देशाच्या उत्तर भागात सध्या बर्फ पडत आहे. तसेच जम्मू, दिल्ली, पंजाबात पारा घसरल्याने जनजीवनावर परिणाम झाला आहे. तसाच प्रकार सातारा जिल्ह्यातही सुरू झाला आहे. पाच दिवसांपासून वातावरणात शीतलहर असल्याने अंगातून थंडी जाईना अशी स्थिती आहे. त्यामुळे एकप्रकारे थंडीची लाटच आल्याचे चित्र आहे.
सातारा शहरात तर गेल्या काही दिवसांपासून किमान तापमान १५ अंशाखाली आहे. गुरुवारी १२ अंश पारा नोंद झाला. तर महाबळेश्वचा पाराही ११.९ अंश नोंद झाला. शीतलहर आणि पारा घसरल्याने थंडीत वाढ झाली आहे. यामुळे दैनंदिन जीवनावर परिणाम झाला आहे. सकाळच्या सुमारास फिरणाऱ्यांची संख्याही कमी झाली आहे. तर शेतीच्या कामावर अधिक परिणाम झाला आहे. शेतकरी सकाळी दहानंतरच शेतातील कामे उरकत आहेत. तर शहरातील बाजारपेठेवरही परिणाम झाला आहे. या थंडीमुळे ग्रामीण भागही गारठला आहे. तर महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण आहे. तेथे तर गेल्या काही दिवसांपासून कडाक्याच्या थंडीशी नागरिक तसेच पर्यटकांना सामना करावा लागतोय. आणखी काही दिवस कडाक्याची थंडी राहील, असा अंदाज आहे.
सातारा शहरात नोंद किमान तापमान..
दि. १ जानेवारी १३.७, २ जानेवारी १४.१, ३ जानेवारी १५.४, ४ जानेवारी १६.५, ५ जानेवारी १७.२. ६ जानेवारी १७.५, ७ जानेवारी १७.२. दि. ८ जानेवारी १६.६, ९ जानेवारी २०.२, १० जानेवारी १८.१, दि. ११ जानेवारी १७.४, १२ जानेवारी १६.१, १३ जानेवारी १५.५, १४ जानेवारी १५.८, दि. १५ जानेवारी १४.५, १६ जानेवारी १२.४, १७ जानेवारी १३, १८ जानेवारी १२