महाबळेश्वर बनतंय संशोधनाचं हब!, शेतकऱ्यांसाठी पर्वणी; गहू अन् ढगांनंतर होणार स्ट्रॉबेरीवर संशोधन
By सचिन काकडे | Published: March 31, 2023 02:06 PM2023-03-31T14:06:35+5:302023-03-31T14:07:04+5:30
महाबळेश्वर हे केवळ पर्यटनस्थळच नव्हे तर अलीकडे संशोधन केंद्र म्हणूनही नावारूपास येऊ लागले
सचिन काकडे
सातारा : महाबळेश्वर हे केवळ पर्यटनस्थळच नव्हे तर अलीकडे संशोधन केंद्र म्हणूनही नावारूपास येऊ लागले आहे. गहू गेरवा व ढग संशोधन केंद्रानंतर याठिकाणी स्ट्रॉबेरी संशोधन केंद्र उभे राहत असून, शेतकऱ्यांना रोगप्रतिकारक्षम स्ट्रॉबेरी रोपांची लागवड करता येणार आहे.
स्ट्रॉबेरीवर ग्रेमोल्ड, फूलकीडे, माइट, रेड स्टील, बोटरॅसिस अशा प्रकारचे रोग येतात तर ॲनफ्रेक नोझ ही बुरशीदेखील पडते. याचा मोठा फटका स्ट्रॉबेरीला बसतो. अशा रोगांपासून हे पीक वाचावे, यासाठी महाबळेश्वरात स्ट्रॉबेरी संशोधन केंद्र सुरू व्हावे, अशी शेतकऱ्यांनी मागणी होती. दहा वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर राहुरी कृषी विद्यापीठाने या संशोधन केंद्राला हिरवा कंदिल दाखविल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
महाबळेश्वरच्या विभागीय गहू गेरवा संशोधन केंद्रात स्वतंत्र प्रयोगशाळा उभारून स्ट्रॉबेरीवर पडणाऱ्या विविध रोगांचे संशोधन होणार असून, येत्या काही दिवसांत प्रयोगशाळेचे काम सुरू होणार आहे. या केंद्रासाठी शासनाने तीन कोटी ४३ लाखांचा निधीही मंजूर केला आहे.
स्ट्रॉबेरीवर असे होणार संशोधन
महाबळेश्वरचे वातावरण स्ट्रॉबेरीला पोषक असले तरी बुरशीनाशक, कीटकशानक तसेच जमिनीतून तयार होणाऱ्या रोगराईचा या पिकाला दरवर्षी फटका बसतो. त्यामुळे स्ट्रॉबेरी उत्पादनातही घट होते. अशा सर्व प्रकारच्या रोगांचे तसेच येथील माती, पाणी आणि रोपांचे प्रयोगशाळेत संशोधन होणार असून, शेतकऱ्यांना रोगास प्रतिकारक्षम असलेल्या रोपांची लागवड करता येणार आहे.
विभागीय गहू गेरवा संशोधन केंद्र
महाबळेश्वरचे वातावरण गव्हावर पडणाऱ्या तांबेरा रोगावरील संशोधन करण्यासाठी पोषक आहे. त्यामुळे या ठिकाणी १८ मार्च १९४१ रोजी गहू गेरवा संशोधन केंद्राची स्थापणा करण्यात आली. दरवर्षी भारतातून सुमारे चार हजार गव्हाचे वाण काळा व नारंगी तांबेरा प्रतिबंध चाचणीसाठी संशोधन केंद्रात येतात.
ढग संशोधक केंद्र
भारत सरकारच्या मान्सून मिशन कार्यक्रमांतर्गत महाबळेश्वरात ढग संशोधन केंद्र साकारण्यात आले. महाबळेश्वरमध्ये ढग जमिनीवर असतात. त्यामुळे येथे ढगांचे निरीक्षण व अभ्यास करणे सोपे झाले आहे. तापमान, आर्द्रता, बाष्पिभवन, रेडिएशन आदींचा अभ्यास प्रयोगशाळेत केला जातो. सुमारे ३५ किलोमीटर परिसरातील ढगांचे विश्लेषण या संशोधन केंद्रात केले जाते.
गहू गेरवा संशोधन केंद्रात गव्हावर संशोधन केले जाते, त्याप्रमाणे स्थानिक पीक म्हणून स्ट्रॉबेरीवरही संशोधन व्हावे, अशी शेतकऱ्यांची मागणी होती. यासाठी शेतकरी व लोकप्रतिनिधींनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून, संशोधन केंद्राला मंजुरी मिळाली आहे. हे केंद्र शेतकऱ्यांसाठी नक्कीच फलदायी ठरेल. - किसनशेठ भिलारे, अध्यक्ष, सहकारी फळे, फुले व भाजीपाला खरेदी- विक्री संस्था
स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकरी : २,०००
दरवर्षी उत्पादन : ४० हजार मेट्रिक टन
देशातील एकूण उत्पादनाचा वाटा : ८५ टक्के