उष्णतेची लाट असतानाच महाबळेश्वर धुक्यात हरवले; पर्यटक भारावले
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2022 03:55 PM2022-05-12T15:55:21+5:302022-05-12T17:26:34+5:30
वातावरणातील बदलामुळे शहरात सकाळी व सायंकाळी धुक्याची दुलई पसरत असून, पर्यटक या आल्हाददायक वातावरणाचा मनमुराद आनंद लुटत आहेत.
महाबळेश्वर : राज्यात एकीकडे उष्णतेची लाट पसरली असताना थंड हवेचे ठिकाण असलेल्या महाबळेश्वरात निसर्गाचा अनोखा आविष्कार पर्यटकांना अनुभवयास मिळत आहे. वातावरणातील बदलामुळे शहरात सकाळी व सायंकाळी धुक्याची दुलई पसरत असून, पर्यटक या आल्हाददायक वातावरणाचा मनमुराद आनंद लुटत आहेत.
महाबळेश्वरचा निसर्ग पर्यटकांना नेहमीच आपल्याकडे आकर्षित करीत असतो. या निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी दरवर्षी लाखो पर्यटक या पर्यटननगरीला भेट देत असतात. पर्यटकांचा उन्हाळी हंगाम नुकताच सुरू झाल्याने महाबळेश्वर पर्यटकांनी गजबजून गेले आहे. हे पर्यटक सध्या धुक्याचा आनंद घेऊ लागले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून राज्यात उन्हाची तीव्रता वाढू लागली आहे. मात्र, महाबळेश्वर याला अपवाद ठरू पाहत आहे. येथील वातावरण सातत्याने बदलत आहे. थंडीबरोबरच सकाळी व सायंकाळी सर्वत्र धुक्याची चादर पसरत आहे. ऐन उन्हाळ्यात निर्माण झालेले हे वातावरण पाहून पर्यटकही भारावून जात आहेत. सायंकाळी वेण्णा जलाशयात नौकाविहार करण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत आहे तर रात्री मुख्य बाजारपेठेला यात्रेचे स्वरूप येत आहे.
वाहतूक कोंडीची समस्या कायम
पर्यटकांचा मुख्य हंगाम सुरू झाल्याने महाबळेश्वरात दररोज महाराष्ट्रासह कर्नाटक, गुजरात, दिल्ली या राज्यातील पर्यटक हजेरी लावत आहेत. मात्र, अद्यापही पालिका व पोलीस प्रशासनाकडून वाहतुकीबाबत कोणतेही नियोजन करण्यात आले नाही. त्यामुळे वेण्णा जलाशय ते महाबळेश्वर, महाडनाका रोड, मुख्य बाजारपेठ तसेच ब्रिटिशकालीन पॉइंटकडे जाणाऱ्या मार्गावर सातत्याने वाहतूक कोंडी होत आहे.