महाबळेश्वरातील खून अनैतिक संबंधातून

By admin | Published: February 14, 2016 12:43 AM2016-02-14T00:43:18+5:302016-02-14T00:43:18+5:30

दोघे फरार : प्रेयसीसह चौघांना अटक

Mahabaleshwar murders are related to immoral relations | महाबळेश्वरातील खून अनैतिक संबंधातून

महाबळेश्वरातील खून अनैतिक संबंधातून

Next

महाबळेश्वर : येथील लॉडविक पॉइंटच्या टेकडीवर प्रकाश पांडुरंग कराळे (वय ३५, रा. थिटे वस्ती, खराडी, पुणे) याचा झालेला खून हा अनैतिक संबंधातून झाल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी कराळेच्या प्रेयसीसह चौघांना अटक केली आहे. दरम्यान, प्रकाशकडून सतत मारहाण होत असल्याने कंटाळून प्रेयसीने दुसऱ्या प्रियकराच्या मदतीने हा खुनाचा कट रचला. अटक केलेल्यांमध्ये दोन महिला व दोन पुरुषांचा समावेश आहे. तर फरार दोघांचा शोध सुरू आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांनी या प्रकरणात प्रकाशची प्रेयसी सोनाली बालाजी काशीद, निखिल संतोष भाटी (वय २०), ज्योती काशिनाथ चिकणे (वय २३), मनोज काशिनाथ चिकणे (वय ३०, चौघेही रा. इंदिरानगर नं. १, नायर गणेश मंदिराजवळ, जेएन रोड, मुलुंड, मुंबई) यांना अटक केली आहे. यामधील ज्योती व मनोज हे बहीण-भाऊ महाबळेश्वर तालुक्यातील जावली या गावचे मूळ रहिवासी आहेत. तर या कटात सहभागी असणारे राहुल जयसिंग साळुंखे आणि आकाश खुशाल चव्हाण हे दोघे फरार आहेत. याबाबत महाबळेश्वरचे पोलीस निरीक्षक प्रकाश सावंत यांनी माहिती दिली. ते म्हणाले, ‘मृत प्रकाश पांडुरंग कराळे (वय ३५, रा. थिटे वस्ती, खराडी पुणे) हा पत्नी व चार मुलांसह राहात होता. प्रकाशच्या घराजवळच सोनाली काशीद (वय २३) ही पती व दोन मुलांसह राहात होती. सोनालीचे व पतीचे सतत भांडण होत होते. भांडणामुळे पती सोनालीला सोडून निघून गेला. पती गेल्यानंतरच्या काळात सोनालीची प्रकाशबरोबर ओळख झाली. पुढे ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. या प्रेम प्रकरणाची माहिती प्रकाशच्या पत्नीलाही समजली. त्यामुळे दोघा पती-पत्नीत वाद होऊ लागले. तसेच प्रकाशच्या पत्नीत आणि सोनालीतही भांडणे सुरू झाली. त्यातूनच प्रकाशला दारूचे व्यसन लागले. त्यामुळे सोनालीलाही तो मारहाण करू लागला. परिणामी, निराश होऊन सोनाली मुलुंड येथील आपल्या माहेरी गेली.
तरीही प्रकाशने तिचा पाठलाग सोडला नाही. तो मुलुंडमधील तिच्या घरी जाऊ लागला. तेथेही प्रकाशकडून सोनालीला मारहाण होत होती. त्यामुळे सोनाली वैतागली. याचदरम्यान, सोनालीचे एकाशी प्रेम जुळले. सोनालीने दुसऱ्या प्रियकराला ‘मला प्रकाशपासून सुटका हवी आहे. तू काहीही कर,’ असे सांगितले. तेव्हा दुसऱ्या प्रियकराने सोनाली तसेच सोनालीचा भाऊ निखिल, सोनालीची मैत्रीण ज्योती व ज्योतीचा भाऊ मनोज तसेच मनोजचा एक नातेवाईक अशा सहाजणांनी सोनालीच्या घरात बसून प्रकाशच्या हत्येचा कट रचला.
७ फेब्रुवारीला नेहमीप्रमाणे प्रकाश सोनालीला भेटण्यासाठी मुंबईला गेला. जाताना त्याने घरी आपल्या पत्नीलाही तशी माहिती दिली होती. प्रकाश घरी आल्यानंतर सोनालीने याची माहिती आकाशला दिली. आकाश त्याच दिवशी नागपूर येथून मुंबईकडे निघाला. ‘आम्ही सर्वजण महाबळेश्वर फिरायला निघालो आहे. तू येतोस का?,’ असे सोनालीने प्रकाशला विचारले. प्रकाशही त्यांच्याबरोबर महाबळेश्वरला फिरण्यासाठी आला. मंगळवारी दुपारी ते महाबळेश्वरला आले. त्यानंतर ते लॉडविक पॉइंटकडे आले. एक तास फिरल्यानंतर सर्वांनीच पाणीपुरी खाल्ली. त्यानंतर ते महाबळेश्वरकडे येण्यास निघाले.
थोडे अंतर चालल्यावर एक पायवाट दिसली. त्या वाटेने राहुल व आकाश जंगलात गेले. ‘फोटोसाठी चांगली जागा आहे,’ असे सांगून त्यांनी प्रकाशला लॉडविक पॉइंटच्या टेकडीवर नेले. टेकडीवर सोनाली व प्रकाश यांच्यात भांडण सुरू झाले. या भांडणातून प्रकाशला खाली पाडण्यात आले. त्यातील एकाने पाय धरले तर दुसऱ्याने प्रकाशचा गळा चिरला. ओळख पटू नये म्हणून प्रकाशच्या तोंडावर मोठा दगड घालून चेहरा विद्रूप करण्यात आला. प्रकाशचा मृत्यू झाल्याची खात्री पटताच सर्वजण महाबळेश्वरात आले. त्यानंतर पोलादपूर व तेथून मुंबईला गेले. (वार्ताहर)
भेळवाल्याने आरोपींना ओळखले...
खून झाल्यानंतर प्रकाशच्या खिशातील सर्व वस्तू आरोपींनी नेल्या होत्या. त्यामुळे पोलिसांना तपासाची दिशा निश्चित करताना अडचणी येत होत्या; परंतु पोलीस निरीक्षक सावंत यांनी पॉइंटवरील भेळवाल्याला भेटून बोलते केले. मृताच्या पोटात शवविच्छेदनादरम्यान भेळ आढळून आली. प्रथम नकार देणाऱ्या भेळवाल्याने आपण सर्वांना पाहिल्याची कबुली देत अटक करणाऱ्यांना ओळखलेही.

Web Title: Mahabaleshwar murders are related to immoral relations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.