महाबळेश्वर, पाचगणीमधील वीज, पाणीपुरवठा सुरळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:42 AM2021-05-20T04:42:56+5:302021-05-20T04:42:56+5:30
महाबळेश्वर : वीजपुरवठा खंडित झाल्याने शहरात निर्माण झालेली कृत्रिम पाणीटंचाई बुधवारी चौथ्या दिवशी संपुष्टात आली. चार दिवसांच्या प्रतीक्षेनंतर ...
महाबळेश्वर : वीजपुरवठा खंडित झाल्याने शहरात निर्माण झालेली कृत्रिम पाणीटंचाई बुधवारी चौथ्या दिवशी संपुष्टात आली. चार दिवसांच्या प्रतीक्षेनंतर महाबळेश्वर व पाचगणी येथे वीज व पाणीपुरवठा सुरळीत झाला.
तौक्ते चक्रीवादळाचा महाबळेश्वर तालुक्याला मोठा फटका बसला होता. वादळामुळे वीज वितरण कंपनीचे कंबरडेच मोडले होते. अनेक ठिकाणी विजेचे खांब पडले होते तर विजेच्या ताराही अनेक ठिकाणी तुटल्या होत्या. यामुळे वीजपुरवठ्यामध्ये मोठा अडथळा निर्माण झाला होता. शनिवारपासून शहराचा वीजपुरवठा बंद पडला होता. गेले चार दिवस वीजपुरवठा सुरळीत करण्याचे प्रयत्न वीज वितरण विभागाकडून करण्यात येत होते. महाबळेश्वर व पाचगणी शहरास जीवन प्राधिकरणाच्या वतीने पिण्याचे पाणी पुरविले जाते. वीजपुरवठा खंडित झाल्याने या दोन्ही शहरांचा पाणीपुरवठा बंद पडला होता. वीजपुरवठा एक-दोन दिवसांत सुरू होईल, या अपेक्षेने प्राधिकरणाने पाणी पुरविण्यासाठी काही प्रयत्न केले नाहीत. नगराध्यक्ष व नगरसेवक यांनी शहरातील कृत्रिम पाणीटंचाईची साधी दखलही न घेतल्याने शहरातील नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त केला जात होता. दरम्यान, पाणीटंचाईमुळे शहरातील नागरिकांची पाण्यासाठी भटकंती सुरू झाली. तीन दिवसांच्या प्रतीक्षेनंतर मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांनी शहर पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी पुढाकार घेण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर वीज व पाणीपुरवठा सुरळीत झाला.