महाबळेश्वरचा पाऊस साडेचार हजारी, कोयना धरणातील पाणीसाठा अजून वाढेना
By नितीन काळेल | Published: August 23, 2023 12:19 PM2023-08-23T12:19:07+5:302023-08-23T12:19:25+5:30
कोयनेला गतवर्षीपेक्षा कमी पाऊस
सातारा : जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी असलेतरी महाबळेश्वरच्या पर्जन्यमानाने यावर्षीचा साडे चार हजार मिलीमीटरचा टप्पा गाठला आहे. तर कोयनेला गतवर्षीपेक्षा कमी पाऊस झालेला आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठाही वाढेना अशी स्थिती आहे. बुधवारी सकाळच्या सुमारास धरणात ८४.७० टीएमसी पाणीसाठा झाला होता.
जिल्ह्यात जून महिन्याच्या उत्तरार्धात पावसाला सुरूवात झाली. त्यानंतर जुलै महिन्यात चांगला पाऊस पडला. पश्चिम भागात मागीलवर्षीच्या तुलनेत अधिक पर्जन्यमानाची नोंद झाली. मात्र, मागील २० दिवसांपासून पश्चिमेकडे अत्यल्प पाऊस पडत आहे. तसेच पूर्व भागात पावसाची दडी कायम आहे. यामुळे चिंता वाढलेली आहे. सध्यस्थितीचा विचार करता यंदा कोयनानगर आणि महाबळेश्वरला गतवर्षीपेक्षा पाऊस कमी झालेला आहे. तर नवजाला अधिक पावसाची नोंद झाली आहे.
बुधवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत पश्चिम भागात अत्यल्प पाऊस पडला. कोयनानगर येथे ८ आणि नवजाला ५ मिलीमीटरची नोंद झाली. तर महाबळेश्वरला १० मिलीमीटर पाऊस पडला आहे. एक जूनपासूनचा विचार करता कोयनानगरला ३३६४ तर नवाजाला ४८०० आणि महाबळेश्वर येथे ४५०० मिलीमीटर पाऊस पडलेला आहे. त्याचबरोबर पाऊस नसल्याने कोयना धरणात येणाऱ्या पाण्याची आवकही कमी झाली आहे. सकाळच्या सुमारास १३३३ क्यूसेक वेगाने पाणी येत होते. तर धरण पाणीसाठा ८४.७० टीएमसी झालेला.