सातारा: महाबळेश्वरला सर्वाधिक पाऊस, कोयना धरणात ९७ टीएमसी पाणीसाठा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2022 04:58 PM2022-08-18T16:58:21+5:302022-08-18T16:59:00+5:30
कोयना धरणातून १९,४७६ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू
सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर कमी झाला असला तरी यावर्षी महाबळेश्वरचा पाऊस पाच हजार मिलीमीटरजवळ पोहोचलाय. तर नवजाला ४२८८ आणि कोयनानगर येथे ३६५७ मिलीमीटर झाला आहे. दरम्यान, धरणांतील साठा वाढत असून, कोयनेत ९७ टीएमसी पाणीसाठा झाला आहे.
यावर्षी जूनच्या अखेरीस खऱ्या अर्थाने पावसाळ्यास सुरुवात झाली. पूर्व तसेच पश्चिम भागात पावसाचा जोर वाढला. तर पश्चिम भागात जुलै सुरू झाल्यापासून सलग १५ दिवस धो-धो पाऊस कोसळत होता. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. त्याचबरोबर प्रमुख धरणांमध्येही मोठ्या प्रमाणात साठा वाढला. मात्र, १५ जुलैनंतर पावसाचा जोर कमी झाला. ऑगस्ट महिना सुरू झाल्यापासून पावसाचा जोर पुन्हा वाढला. सलग १० दिवस पश्चिम भागात जोरदार पाऊस झाला.
गुरुवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे ६९ मिलीमीटर पाऊस पडला. तर नवजाला ५० आणि महाबळेश्वर येथे ८० मिलीमीटर पावसाची नोंद झाली. तर कोयना धरणात ९७.०७ टीएमसी पाणीसाठा झाला होता. धरणाचे सहा दरवाजे तीन फुटांवर स्थिर असून, त्यातून १९,४७६ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. हे सर्व पाणी कोयना नदीत जात आहे.
प्रमुख धरणांतील विसर्ग असा...
जिल्ह्याच्या पश्चिम भागातच प्रमुख धरणे आहेत. या धरणक्षेत्रात पाऊस पडत आहे. त्यामुळे पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी विसर्ग सुरू आहे. गुरुवारी सकाळी धोममधून एकूण १३६८ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता. तर कोयनेतून २१,५७६ क्युसेक, कण्हेर धरण ५५०, उरमोडी २९३३, तारळी ७८०, बलकवडी ९१९ आणि वीर धरणातून १५ हजार १३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता.