सातारा जिल्ह्यात महाबळेश्वरला सर्वाधिक पावसाची नोंद, कोयना धरणात गतवर्षीच्या तुलनेत अधिक पाणीसाठा
By नितीन काळेल | Published: July 13, 2024 06:43 PM2024-07-13T18:43:22+5:302024-07-13T18:43:39+5:30
जुलै महिन्यातच पावसाचा जोर वाढला
सातारा : जिल्ह्यात मागीलवर्षीच्या तुलनेत यंदा पर्जन्यमान अधिक राहिले आहे. कोयनानगर येथे ७२०, नवजाला ५३४ आणि महाबळेश्वरला ११८ मिलिमीटर पाऊस जादा झाला आहे. तर कोयना धरणातही गतवर्षीच्या तुलनेत ११ टीएमसीने साठा अधिक आहे. सध्या धरणात ३४.६० टीएमसी साठा झाला आहे. तर शनिवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस महाबळेश्वरला ११९ मिलिमीटर झाला होता.
जिल्ह्यात गेल्यावर्षी मान्सूनचा पाऊस उशिरा सुरू झाला होता. तसेच त्यानंतरही पावसाची उघडझाप होती. त्यामुळे जुलै महिन्यातच पावसाचा जोर वाढलेला. पण, गतवर्षी एकूणच पाऊस कमी झालेला. त्यामुळे जिल्ह्याच्या पर्जन्यमानाने १०० टक्क्यांची सरासरीही गाठली नव्हती. सर्वच तालुक्यात कमी पाऊस झालेला. यामुळे बहुतांशी प्रमुख धरणे भरली नव्हती. कोयना धरणातही ९५ टीएमसीपर्यंतच साठा झालेला. परिणामी गेल्यावर्षी दुष्काळी स्थिती निर्माण झालेली. मात्र, यंदा आतापर्यंततरी पाऊस चांगला झालेला आहे.
यावर्षी जून महिन्याच्या सुरुवातीलाच मान्सूनचा पाऊस दाखल झाला. मागील एक महिन्यापासून पाऊस होत आहे. पावसाचे प्रमाण कमी-अधिक होत असलेतरी शेतीसाठी हा पाऊस उपयुक्त ठरला. त्यामुळे खरीप हंगामातील पेरणी ९० टक्क्यांपर्यंत पोहोचली. तसेच कोयनासारख्या महत्त्वाच्या धरणातही सावकाश का असेना पाणीसाठा वाढू लागला आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा पावसाचे प्रमाण अधिक राहिले आहे. गेल्यावर्षी १३ जुलैपर्यंत कोयनेला ९२८ मिलिमीटर पर्जन्यमान झाले होते. यंदा १ हजार ६४८ मिलिमीटर पाऊस झालेला आहे. तसेच नवजा येथे मागीलवर्षी १ हजार ३२९ मिलिमीटर पाऊस झालेला. तर आतापर्यंत नवजा येथे १ हजार ८ ३३ मिलिमीटर पर्जन्यमान झाले आहे. तसेच महाबळेश्वरलाही अधिक पाऊस झाला आहे.
एक जूनपासून आतापर्यंत येथे १ हजार ५१५ मिलिमीटर पाऊस पडला आहे. त्यामुळे पश्चिम भागातही यंदा जादा पाऊस झाल्याचे समोर आलेले आहे. जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस सुरूच आहे. शनिवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे ४२ तर नवजाला ८० मिलिमीटर पाऊस पडलेला आहे. त्याचबरोबर कोयना धरणात पाण्याची आवक वाढली आहे. ११ हजार ५८५ क्यूसेक वेगाने पाणी येत होते. त्यामुळे धरणातील पाणीसाठा वाढून ३४.६० टीएमसी झाला आहे.
महाबळेश्वर तालुक्यात ६६ मिलिमीटर पाऊस..
जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात कमी-अधिक फरकाने पाऊस पडत आहे. शनिवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत जिल्ह्यात सरासरी ७.५ मिलिमीटर पर्जन्यमान झाले. सर्वाधिक पाऊस महाबळेश्वर तालुक्यात ६६.८ मिलिमीटर पडला. तर सातारा तालुक्यात ४.७, जावळी १३.९, पाटण ६.९, कऱ्हाड तालुक्यात ३.२, कोरेगाव ३.२, खटावला १.४, माणमध्ये ०.४, फलटण तालुक्यात १.७, खंडाळा ५.२ आणि वाई तालुक्यात सरासरी १४.९ मिलिमीटर पाऊस पडला आहे.