महाबळेश्वर : धुके अन् पावसाचा आधार घेऊन फोडल्या तीन पतसंस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2018 03:10 PM2018-07-14T15:10:45+5:302018-07-14T15:13:02+5:30
धुके अन् पावसाचा आधार घेऊन शहरातील तीन पतसंस्थांचे कुलूप तोडून चोरट्यांनी सुमारे चार लाख रुपयांची रोकड लंपास केली. चोरीची ही घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली. या घटनेमुळे महाबळेश्वर शहरात खळबळ उडाली आहे.
महाबळेश्वर : धुके अन् पावसाचा आधार घेऊन शहरातील तीन पतसंस्थांचे कुलूप तोडून चोरट्यांनी सुमारे चार लाख रुपयांची रोकड लंपास केली. चोरीची ही घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली. या घटनेमुळे महाबळेश्वर शहरात खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, महाबळेश्वर येथील महात्मा फुले भाजी मंडईजवळ जनता नागरी सहकारी पतसंस्था, गोटेनीरा जननी माता बिगरशेती सहकारी व साई नागरी सहकारी या तीन पतसंस्थांची कार्यालये आहेत. शुक्रवारी सायंकाळी नेहमीप्रमाणे कामकाज संपल्यानंतर कर्मचारी पतसंस्था बंद करून घरी निघून गेले.
दरम्यान, मध्यरात्री अडीच ते तीन वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी मोठ्या शिताफीने एकापाठोपाठ एक या तिन्ही पतसंस्थांचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला. यानंतर चोरट्यांनी जनता नागरी सहकारी पतसंस्था व गोटेनीरा जननीमाता बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या ड्रॉव्हरमध्ये ठेवलेली रोकड लंपास केली. साई नागरी पतसंस्थेत मात्र चोरट्यांच्या हाती काहीच लागले नाही. या पतसंस्थेत अत्यावश्यक कागदपत्रे इतरत्र पसरली होती.
शनिवारी सकाळी चोरीच्या घटना उघडकीस येताच नागरिकांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी श्वानपथक व ठसे तज्ज्ञांच्या माध्यमातून चोरट्यांचा तपास केला. मात्र पोलिसांच्या हाती कोणताही ठोस पुरावा लागला नाही.
दरम्यान, पतसंस्थेच्या आवारात लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीमध्ये चोरटे बंदिस्त झाले आहेत. तोंडाला रुमाल बांधून तसेच हातामध्ये बॅटरी व एक्साब्लेड घेऊन पतसंस्थांना लावलेले कुलूप फोडल्याचे सीसीटीव्हीत कैद झाले आहे. एका रात्रीत तीन पतसंस्थांमध्ये चोरी झाल्याने महाबळेश्वरसह परिसरात खळबळ उडाली आहे.