हिमाचल येथे महाबळेश्वर ट्रेकर्स, शिवेंद्रसिंहराजे रेस्क्यू टीमच्या गाडीला अपघात, सुदैवाने सर्वजण सुखरूप
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2022 02:29 PM2022-06-06T14:29:53+5:302022-06-06T14:30:28+5:30
या अपघाताची माहिती सातारा जिल्ह्यात समजताच खळबळ उडाली. युवकांच्या चिंतेने पालकांकडून प्रशासनाला माहिती विचारण्यात येऊ लागली. त्यानंतर प्रशासनानेही तातडीने तेथील प्रशासनाशी संपर्क साधून युवकांच्या प्रकृतीबाबत माहिती घेतली.
सातारा : हिमाचल प्रदेश (मनाली) येथे प्रशिक्षणासाठी गेलेल्या महाबळेश्वर ट्रेकर्स आणि शिवेंद्रसिंहराजे रेस्क्यू टीमच्या जवानांच्या गाडीला आज, सोमवारी पहाटे अपघात झाला. या अपघातात चालक जखमी झाला असून, इतर सर्व ५० ट्रेकर्स सुखरूप असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. दरम्यान, चालकावर मनाली येथे उपचार सुरू आहेत.
जिल्हा परिषदेमार्फत जिल्हा वार्षिक योजनेतील नावीन्यपूर्ण योजनेअंतर्गत सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर, सातारा, जावळी आणि पाटण तालुक्यातील ५० युवकांना साहसी क्रीडा प्रकाराच्या (बेसिक माऊंटेनिअरिंग कोर्स) प्रशिक्षणासाठी हिमाचल प्रदेश येथे पाठविण्यात आले होते. या प्रशिक्षणाचा कालावधी ११ मे ते ५ जून असा २६ दिवसांचा होता. अटलबिहारी वाजपेयी इन्स्टिट्यूट ऑफ माऊंटेनिअरिंग ॲण्ड अलाईड स्पोर्ट्स, मनाली (हिमाचल प्रदेश) येथे हे प्रशिक्षण पार पडले.
त्यानंतर युवकांनी ५ जून रोजी रात्री परतीचा प्रवास सुरू केला. प्रवासादरम्यान सोमवार, दि. ६ रोजी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास हिमाचल प्रदेशमधील विलासपूर जिल्ह्यातील मंडीनजीक दोन खासगी ट्रॅव्हल्सची समोरासमोर धडक झाली. यामध्ये ट्रॅव्हल्सचा चालक व इतर काहीजण किरकोळ जखमी झाले.
या अपघाताची माहिती सातारा जिल्ह्यात समजताच खळबळ उडाली. युवकांच्या चिंतेने पालकांकडून प्रशासनाला माहिती विचारण्यात येऊ लागली. त्यानंतर प्रशासनानेही तातडीने तेथील प्रशासनाशी संपर्क साधून युवकांच्या प्रकृतीबाबत माहिती घेतली. प्रशिक्षणासाठी गेलेले सर्व ५० युवक व त्यांच्यासोबत असलेले जिल्हा परिषदेचे दोन कर्मचारी असे सर्वजण सुखरूप असल्याचे सांगण्यात आले. या अपघातानंतर जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनीही तातडीने तेथील जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून लागेल ती मदत देण्याचे सांगितले.
या सर्व युवकांना दिल्ली येथे आणण्याची व्यवस्था करण्यात आली असून महाराष्ट्र भवन नवी दिल्ली येथे त्यांच्या निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. हे सर्व युवक दि. ७ जून रोजी रेल्वेने नवी दिल्ली येथून साताऱ्याकडे येण्यासाठी निघणार आहेत. सर्व प्रशिक्षणार्थी युवक सुखरूप असून पालकांनी कोणतीही काळजी करू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विजय गाैडा यांनी केले आहे.