महाबळेश्वर -वेण्णालेकची गळती थांबवायला दोन ट्रक चिंध्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 11:13 PM2017-11-20T23:13:19+5:302017-11-20T23:19:28+5:30
महाबळेश्वर : वेण्णा धरणाची गळती शोधण्यात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, जलसिंचन विभाग व महाबळेश्वर नगरपरिषदेच्या विशेष पथकाला महिन्यानंतर यश आले
महाबळेश्वर : वेण्णा धरणाची गळती शोधण्यात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, जलसिंचन विभाग व महाबळेश्वर नगरपरिषदेच्या विशेष पथकाला महिन्यानंतर यश आले. गळतीचा खड्डा मुजविण्याचे काम रविवार रात्रीपासून सुरू केले. त्यामध्ये तब्बल दोन ट्रक चिंध्या टाकण्यात आल्या. त्यामुळे गळती ऐंशी टक्के कमी करण्यात यश आले.
वेण्णा धरण पूर्ण क्षमतेने भरले होते. धरणातून महाबळेश्वर व पाचगणी या पर्यटनस्थळांना पिण्याचा पाणी पुरवठा केला जातो. पावसाळा संपताच धरणातून पाण्याची गळती होत असल्याचे निदर्शनास आले. भाजपाचे जिल्हा सरचिटणीस रवींद्र कुंभारदरे यांनी वेण्णा धरणातील गळतीकडे प्रसिद्धी माध्यमांचे लक्ष वेधले.
आमदार मकरंद पाटील यांनीही या गळतीची गंभीर दखल घेतली. संबंधित विविध विभागांतील वरिष्ठ अधिकाºयांना पाचारण केले. वेण्णा धरणाला भेट देऊन गळतीची पाहणी केली. गळती तातडीने थांबविण्याच्या कामाला सुरुवात करण्याचे आदेश अधिकाºयांना दिले होते. त्यानंतरही अनेक दिवस संबंधित अधिकाºयांनी दुर्लक्षच केले. त्यामुळे वेण्णा धरणातील पाण्याची गळती तशीच सुरू राहिली. उलट गळतीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत गेले.
महाबळेश्वर व पाचगणी शहरांना दिवसाला जेवढे पाणी लागते, त्याहून अधिक पाणी गळतीतून बाहेर पडत होते. काही दिवसांपूर्वी गळती होणारे पाणी पुन्हा उचलून जॅकवेलमध्ये घेण्यास सुरुवात झाली. मात्र गळती तशीच सुरू राहिली. जलसिंचन विभाग पानबुड्यांच्या मदतीने गळतीच्या ठिकाणाचा शोध घेणार असल्याचे सांगण्यात येत होते.
जलसिंचन विभागाने धरणाकडे दोन महिने पाहिले नाही. या गळतीमुळे धरणाची पाणीपातळी रोज सहा सेमी खाली जात होती. यामुळे वेण्णा धरणाच्या पाण्याची पातळी खालावल्याने जीवन प्राधिकरणपुढे संकट उभे राहिले होते.
जीवन प्राधिकरण, जलसिंचन विभाग व नगरपालिका यांचे विशेष पथक तयार केले होते. पथकाने रविवारी सांडव्यापासून धरणाच्या किनाºयावरून पाहणी करण्यास सुरुवात केली. पाणबुड्यांचा पोषाख घालून कर्मचारी पाण्यात उतरून गळतीचे ठिकाण शोधण्याचे काम सुरू केले.
सांडव्यापासून अंदाजे साठ फूट अंतरावर पाण्यात एक मोठे छिद्र दिसले. त्या ठिकाणी पाण्याचा भोवरा होत असल्याने प्रथम कापूस टाकून बघण्यात आले. याच ठिकाणाहून पाणी खाली जात असल्याची खात्री झाली. तज्ज्ञांनी छिद्रात कापूस, कपडे आदी वस्तू टाकण्याच्या सूचना केल्या. तहसीलदार रमेश शेंडगे, नगराध्यक्षा स्वप्नाली शिंदे, नगरसेवक कुमार शिंदे यांनी गळतीची पाहणी केली.
हॉटेल, शाळांमधून कपडे
गळती मुजविण्याचे काम रविवारी रात्री तत्काळ हाती घेण्यात आले. त्यासाठी कपडे, पोती, माती व इतर साहित्य टाकण्यात आले. जेवढे कपडे टाकली जात होती तेवढी ती आत जात होती. त्यामुळे गळती मोठी असल्याची खात्री झाली. साधारणत: दोन ट्रक भरेल इतके साहित्य पालिकेने अंजुमन शाळा, हॉटेल व्यावसायिक व स्थानिक व्यापाºयांकडून गोळा केले. यामध्ये जुनी कपडे, गाद्या, गोधड्या, चादरी, बेडसीट, पोती, प्लास्टिकची पोती यांचा समावेश होता. गोळा केलेले साहित्य छिद्रात टाकत होते. मध्यरात्री एक वाजेपर्यंत हे काम सुरू होते. नगरसेवक कुमार शिंदे, सुनील भाटिया, सचिन दीक्षित, संदीप आखाडे, अनिकेत रिंगे, विशाल तोष्णीवाल, संजय शिंदे, दिनेश बिरामने, राजू शेख, तजुभाई व पालिकेचे कर्मचारी रात्री उपस्थित होते.वेण्णा तलावाची सोमवारी सकाळी पाहणी केली असता ऐंशी टक्के गळती कमी झाली होती. नगराध्यक्षा शिंदे, उपनगराध्यक्ष अफजल सुतार, नगरसेवक शिंदे, युसूफ शेख, रवींद्र कुंभारदरे, संदीप आखाडे यांनी भेट देऊन पाहणी केली.
धरणातील गळतीवर काढलेला हा तात्पुरता उपाय आहे. पाणीपातळी कमी झाल्यावर संबंधित अधिकाºयांनी गांभीर्याने लक्ष देऊन कायमच्या उपाययोजना कराव्यात. जेणेकरून पर्यटन हंगामामध्ये पाणीटंचाई भासणार नाही.
- स्वप्नाली शिंदे, नगराध्यक्षा