महाबळेश्वरात अवतरलं काश्मीर, दुसऱ्या दिवशीही हिमकणांचा नजराना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2022 04:53 PM2022-01-13T16:53:20+5:302022-01-13T19:27:20+5:30

आज, गुरुवारी सलग दुसऱ्या दिवशी येथील पारा शून्य अंशांवर स्थिरावला. पारा खालावल्याने वेण्णा जलाशय व लिंगमळा परिसरात पुन्हा एकदा दवबिंदू गोठून पांढऱ्याशुभ्र हिमकणांची चादर पसरली.

Mahabaleshwar at zero degrees Temperature | महाबळेश्वरात अवतरलं काश्मीर, दुसऱ्या दिवशीही हिमकणांचा नजराना

महाबळेश्वरात अवतरलं काश्मीर, दुसऱ्या दिवशीही हिमकणांचा नजराना

Next

महाबळेश्वर : सातारा जिल्ह्यासह महाबळेश्वरात थंडीचा जोर वाढत चालला असून, आज, गुरुवारी सलग दुसऱ्या दिवशी येथील पारा शून्य अंशांवर स्थिरावला. पारा खालावल्याने वेण्णा जलाशय व लिंगमळा परिसरात पुन्हा एकदा दवबिंदू गोठून पांढऱ्याशुभ्र हिमकणांची चादर पसरली. निसर्गाचा हा अनोखा अविष्कार पर्यटकांना काश्मीरची अनुभूती देऊ लागला आहे.

महाबळेश्वरचा निसर्ग जगभरातील पर्यटकांना नेहमीच आपल्याकडे वेधून घेतो. येथील डोंगर-दऱ्या, पुरातन मंदिरे, ब्रिटिश कालीन पॉइंट सर्वकाही अद्भूत व विलक्षण असेच आहे. या पर्यटनस्थळाला पर्यटक तिन्ही ऋतूत भेट देतात. मात्र हिवाळा ऋतु सुरू झाल्यानंतर ही सौंदर्यनगरी पर्यटकांनी गजबजून जाते कारण येथे येणाऱ्या प्रत्येक पर्यटकांना ओढ लागते ती हिमकण पाहण्याची. येथील वेण्णा जलाशय परिसरात दरवर्षी दवबिंदूंचे हिमकणात रुपांतर होते.

गेल्या अनेक दिवसांपासून तापमानात होणारे चढ-उतार पाहता दवबिंदू गोठण्याची चिन्हे निर्माण झाली होती. बुधवारी येथील पारा शून्य अंशांवर स्थिरावताच दवबिंदू गोठण्याची प्रक्रिया सुरू झाली अन् पर्यटकांना हिमकण पहावयास मिळाले.

बोटीमध्ये चढ-उतार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या जेटीवर ठिकठिकाणी हिमकण साचले होते. रस्त्याकडेला उभ्या असलेल्या गाड्यांच्या टपांवर, गवतावर व रानफुलांवरही हिमकण पाहावयास मिळाले. गुरुवारी दुसऱ्या दिवशी देखील वेण्णा जलाशय परिसरात दवबिंदू गोठल्याने हिमकणाचे दर्शन झाले. थंडीच्या हंगामात सलग दुसऱ्यांदा दवबिंदू गोठल्याने स्थानिक नागरिकांसह पर्यटकांमध्ये कुतूहल निर्माण झाले आहे. हिमकण गोळा करून फोटो काढण्याचा मोह पर्यटकांना आवरता आला नाही.

अशी होते दवबिंदू गोठण्याची प्रक्रिया

डिसेंबर महिना सुरू झाला की महाबळेश्वरात थंडीची लाट पसरते. प्रामुख्याने डिसेंबर अखेर व जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात केवळ वेण्णा जलाशय व लिंगमळा परिसरात दवबिंदू गोठण्याची प्रक्रिया सुरू होते. शहराचे किमान तापमान जरी ९ ते १० अंश सेल्सिअस असले तरी वेण्णा जलाशय व परिसराचा पारा पाण्यामुळे ३ ते ४ अंशांवर घसरतो. दवबिंदूंचे हिमकणात रुपांतर होण्यासाठी इतके तापमान पुरेसे असते. मात्र तापमान याहीपेक्षा कमी झाल्याने दवबिंदू गोठण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.

Web Title: Mahabaleshwar at zero degrees Temperature

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.